क्रिकेट हा मुंबईकरांचा प्राणवायू. स्वाभाविकपणे क्रिकेटवरील सत्ता हीसुद्धा मुंबईचीच. यंदाच्या स्थानिक हंगामात १६ आणि २५ वर्षांखालील राष्ट्रीय जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबईच्या शिरपेचात सोमवारी चाळिसाव्या रणजी करंडक विजेतेपदाचा तुरा खोवला गेला. दुबळ्या सौराष्ट्रचा तब्बल एक डाव आणि १२५ धावांनी पराभव करून अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच मुंबईने जल्लोष साजरा केला. ‘मुंबै, मुंबै..’ , ‘गणपती बाप्पा मोरया..’ असा अविरत जल्लोष वानखेडे स्टेडियमवर त्यानंतर बराच काळ घुमत होता. या जल्लोषभऱ्या वातावरणात मुंबईकरांच्या साक्षीने आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या साथीने कर्णधार अजित आगरकरने जेतेपदाचा चषक उंचावला तेव्हा मुंबईच्या क्रिकेटमधील वर्चस्वाबाबत साऱ्यांनाच हेवा वाटला. त्यानंतर वानखेडेच्या ड्रेसिंगरूममध्ये मुंबईचे खेळाडू, साहाय्यक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी झोकात जश्न साजरा केला. श्ॉम्पेन, केकस् यांचा वर्षांव झाला. सारेच जण या आनंदात न्हाऊन निघाले होते.
वानखेडेच्या खेळपट्टीने तिसऱ्या दिवशी आपले रंग दाखवले आणि गोलंदाजांना पूर्णत: साथ दिली. दिवसभरात १४ बळी गोलंदाजांनी मिळविल्यामुळे तिसऱ्या दिवशीच रणजीचा कौल मिळाला. सकाळच्या सत्रात पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचे मुंबईचे मनसुबे होते, पण मुंबईला जेमतेम ३५५ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. मुंबईने पहिल्या डावात घेतलेली २०७ धावांची आघाडीसुद्धा सौराष्ट्रची परीक्षा पाहणार, हे अपेक्षितच होते, पण सामन्याचा निकाल चौथ्या दिवशी लागेल, असा सर्वाचाच अंदाज होता; परंतु अजित आगरकरने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सौराष्ट्रचा ४० वर्षांचा अनुभवी सलामीवीर सितांशू कोटकला तंबूची वाट दाखवली. मग त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सौराष्ट्रचा दुसरा डाव कोसळला.
आगरकर आणि धवल कुलकर्णी या मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी दोन्ही बाजूंनी आक्रमक मारा करीत सौराष्ट्रची तारांबळ उडवली. त्यामुळे अवघ्या ८२ धावांत सौराष्ट्रचा दुसरा डाव कोसळला. धर्मेद्रसिंग जडेजाने सर्वाधिक २२ धावा केल्या. धवलच्या गोलंदाजीवर जडेजाचा यष्टिरक्षक तरेने अप्रतिम झेल टिपला आणि मुंबईच्या ४०व्या रणजी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तरेने या बळीसह पंजाबच्या उदय कौरने एका रणजी हंगामात यष्टीपाठी घेतलेल्या ४१ बळींच्या विक्रमाची बरोबरी केली. आगरकरने १५ धावांत ४ बळी घेतले, तर धवलने ३२ धावांत ५ बळी घेतले. धवलने या सामन्यांत ५६ धावांत ९ बळी घेत आपला करिश्मा दाखवून दिला. या सामन्यात १३२ धावांची खेळी साकारणाऱ्या वासिम जाफरने सामनावीर किताब जिंकला.
संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र (पहिला डाव) : १४८
मुंबई (पहिला डाव) : ११९ षटकांत सर्व बाद ३५५ (वासिम जाफर १३२, हिकेन शाह ५५, अंकित चव्हाण ४१; कमलेश मकवाना ३/४९)
सौराष्ट्र (दुसरा डाव) : ३६.३ षटकांत सर्व बाद ८२ (धर्मेद्रसिंग जडेजा २२; अजित आगरकर ४/१५, धवल कुलकर्णी ५/३२).

खडतर प्रवासाचा शेवट गोड -सुलक्षण
या वर्षी मुंबईचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खडतर होता, पण या खडतर प्रवासाचा शेवट गोड झाला. बाद फेरीत पोहोचल्यावर खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आणि आम्ही विजेतेपद पटकावू शकलो. मुंबई जिद्दी आणि विजयाची ईर्षां कायम मनात ठेवणारा संघ आहे, ते त्यांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिले. विजयामुळे नक्कीच आनंद झाला आहे, पण यापुढे बोलण्यासाठी शब्द थिटे पडत असल्याचे मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितले. कुलकर्णी पुढे म्हणाले की, या वर्षांच्या सुरुवातीला मी काही आखणी केली होती, त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनने चांगले सहकार्य दिले. खास करून अध्यक्ष रवी सावंत यांनी कुठेही तडजोड केली नाही. त्यामुळे या वर्षी पहिल्यांदा आम्ही बुची-बाबू स्पर्धेबरोबरच बंगळुरू आणि नागपूरमधील चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धा खेळू शकलो आणि त्याचा आम्हाला चांगलाच फायदा झाला. आतापर्यंतच्या कारकीर्दीत मला आवडलेल्या दोन कर्णधारांपैकी एक अजित आगरकर आहे, हे मी जिंकलोय म्हणून बोलत नाही, तर त्याच्यापेक्षा चांगला कर्णधार सध्याच्या घडीला नाही.

सांघिक कामगिरीमुळेच विजेते झालो -सचिन तेंडुलकर
रणजीचे चाळिसावे विजेतेपद पटकावणे हा एक अद्भूत, अविस्मरणीय असाच अनुभव आहे. सांघिक कामगिरीमुळेच आम्ही विजेतेपद पटकावू शकलो. संघात अनुभवी खेळाडूंबरोबर युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. अजित आगरकरसाठी गेले वर्ष खडतर होते, पण यावर्षी त्याने कर्णधाराची भूमिका यशस्वीपणे निभावली. या विजयाचा आनंद मला नक्कीच आहे. पण अजितसाठी अधिक आनंद झाला आहे. ज्या पद्धतीने त्याने संघ हाताळला त्याला तोडच नव्हती. यावर्षी आम्ही विजेते ठरलो आणि यापुढेही विजयाची मालिका चालूच राहील, अशी आशा व्यक्त करतो.

विजयाचा सार्थ अभिमान -आगरकर
रणजी विजेतेपदाच्या आनंदाबरोबरच सार्थ अभिमानही आहे. कारण रणजी करंडक जिंकणे सोपे नसते. गेली काही वर्षे आमच्यासाठी खडतर होती, पण यावर्षी संघातील सर्व खेळाडूंनीच चांगली कामगिरी केली. यापूर्वीही रणजी विजेत्या संघात मी होतो, पण एक कर्णधार या नात्याने मुंबईला विजेतेपद मिळवून देऊ शकलो, याचा आनंद काही औरच आहे. या मोसमात धवल कुलकर्णी, आदित्य तरे, हिकेन शाह, वासिम जाफर आणि अंकित चव्हाण यांची कामगिरी नेत्रदीपक होती. सचिन तेंडुलकरसारख्या अनुभवी आणि मातब्बर खेळाडूची भूमिका आमच्यासाठी फार मोलाची ठरली.

विजेत्या मुंबईच्या खेळाडूंना रोख इनाम!
मुंबई :यंदाच्या चाळीसाव्या जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबईला रणजी करंडक आणि दोन कोटी रुपयांचे बक्षीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळाले. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनकडूनही रणजी विजेत्या मुंबई संघासाठी तीन कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.वानखेडेवर मुंबई आणि शेष भारत यांच्यातील इराणी करंडक सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे ५ फेब्रुवारीला या रणजी विजेत्या खेळाडूंना विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.दरम्यान, मुंबईच्या १६ वर्षांखालील चमूने विजय र्मचट चषक जिंकण्याची किमया साधली. या संघातील खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे दलाल यांनी सांगितले.

विजय र्मचट करंडक स्पर्धेतही मुंबईला जेतेपद
नवी दिल्ली : खिझार दाफेदार आणि अरमान जाफर यांच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने विजय र्मचट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७ बाद ७०१ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा पहिला डाव २२२ धावांवर संपुष्टात आणत मुंबईने पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मुंबईने १ बाद १४२ धावा केल्या. ही लढत अनिर्णीतावस्थेत सुटली तरी मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर जेतेपदावर नाव कोरले.

सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज
खेळाडू                         संघ           सामने    धावा     १००/५०
जीवनज्योत सिंग        पंजाब         १०         ९९५       ५/२
अभिषेक नायर            मुंबई          ११         ९९६       ३/८
मुरलीधरन गौतम        कर्नाटक     ९           ९४३       ३/२
पार्थिव पटेल              गुजरात        ८           ८९५       ३/६
व्ही. ए. जगदीश          केरळ          ८            ८७१       ४/१

सर्वाधिक बळी मिळविणारे पाच फलंदाज
खेळाडू                        संघ    सामने    बळी    ५/१०
ईश्वर पांडे        मध्य प्रदेश       ८         ४८       ५/१
सिद्धार्थ कौल            पंजाब       ९         ४४       २/०
सूरज यादव           सेनादल       १०      ४३       २/०
शाहबाझ नदीम       झारखंड      ९       ४२        २/०
संदीप शर्मा              पंजाब          ९      ४१       ३/१