रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी मुंबईने सौराष्ट्रवर एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच मुंबईने ४१व्यांदा रणजी करंडकावर कब्जा केला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवच्या शतकी भागीदारीमुळे मुंबईने दुसऱ्या दिवसाखेर २७ धावांची आघाडी घेतली होती. यानंतर सिद्धेश लाडने केलेल्या ८८ धावांच्या भागीदारीमुळे पहिल्या डावात मुंबईने १३६ धावांची आघाडी मिळवली होती. सिद्धेश लाड आणि बलविंदर संधू यांनी दहाव्या विकेटसाठी १०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या सौराष्ट्रचा डाव अवघ्या ११५ धावांमध्ये आटोपला. उसळत्या खेळपट्टीवर मुंबईच्या गोलंदाजासंमोर सौराष्ट्राच्या एकाही फलंदाजाने प्रतिकार करण्याची हिंमत दाखविली नाही.
मुंबईतर्फे शार्दूल ठाकूरने ५, तर धवल कुलकर्णी आणि बलविंदर संधू यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय अभिषेक नायरने सौराष्ट्रच्या एका फलंदाजाला माघारी धाडले. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि सिद्धेश लाड यांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.