सध्या करोनामुळे देशातील बहुतांश क्रीडास्पर्धा बंद आहेत. अनेक खेळाडू आपली कारकिर्द घडवण्यासाठी मुंबईत येतात पण त्यांना सध्या नैराश्याचा सामना करावा लागत असल्याचं तज्ञ्जांचं मत आहे. त्यातच मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहणारा मुंबईकर क्रिकेटपटू करण तिवारी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

करण हा २५ वर्षीय क्रिकेटपटू स्थानिक पातळीवरील क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. मुंबई रणजी संघासाठी नेट्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांपैकी तो एक गोलंदाज होता. सोमवारी रात्री गोरेगाव (पू) येथील गोकुळनगर परिसरात आपल्या राहत्या घरी करण तिवारीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. कुरार पोलीस ठाण्यात करणच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली असून चौकशी सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितलं.

एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, करण आपल्या आई आणि भावासोबत राहत होता. करोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे IPL किंवा तत्सम मोठ्या सामन्यांमध्ये खेळायची संधी हुकल्याने करणने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे. या तरुणाने शेवटचा फोन राजस्थानमध्ये असलेल्या आपल्या मित्राला केला होता. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं होतं. यानंतर हा प्रकार करणच्या घरच्यांना कळेपर्यंत वेळ निघून गेली होती. रात्रीच्या जेवणानंतर करणने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.