भारत – वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिकेला १५ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. मात्र त्या आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त असल्याने त्याला आगामी एकदिवसीय मालिकेत खेळता येणार नाही. त्याच्या जागेवर आता मुंबईकर शार्दुल ठाकूर याला पर्यायी खेळाडू म्हणून बीसीसीआयकडून संधी देण्यात आल्याचे सांगितलं जातं आहे.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यानंतर वेदना होत असल्याचे भुवनेश्वर कुमारने संघ व्यवस्थापनाला सांगितले होते. त्यानंतर एकदिवसीय मालिकेला तो मुकणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. शार्दूल हा या एकदिवसीय मालिकेतील दुसरा पर्यायी खेळाडू आहे. या आधी दुखापतग्रस्त धवनच्या जागी मयंक अग्रवाल ला संघात स्थान देण्यात आले आहे.

या अगोदर दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असलेल्या भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. दुखापतीच्या कारणामुळे भुवनेश्वर किमार २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या मालिकेनंतर क्रिकेटपासून दूर राहिला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातदेखील त्याला दुखापतीमुळे संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते.

तडाखेबाज फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजी अशा दुहेरी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली. पहिल्या दोन सामन्यांपैकी दोनही संघाने १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टी २० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.