अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची आवश्यकता असताना अष्टपैलू शुभम रांजणेने (नाबाद ३०) लगावलेल्या अप्रतिम चौकाराच्या बळावर मुंबईने गुरुवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत बंगालचा फक्त तीन गडी राखून पराभव केला.

‘ड’ गटात समावेश असलेल्या मुंबईचा हा सलग पाचवा विजय ठरला. शुभमने गोलंदाजीतही १७ धावांत तीन बळी मिळवून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विवेक सिंग (५६) आणि श्रीवत्स गोस्वामी (४३) यांनी रचलेल्या ६७ धावांच्या सलामी भागीदारीमुळे बंगालने उत्तम सुरुवात केली. परंतु धवल कुलकर्णीने गोस्वामीला बाद केले आणि त्यानंतर शुभमच्या मध्यमगती गोलंदाजीपुढे बंगालचा डाव कोसळला. विवेकसह कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (८) आणि मनोज तिवारी (१२) यांना शुभमने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यामुळे बंगालला २० षटकांत ४ बाद १५३ धावाच करता आल्या.

प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर जय बिश्त (४८) आणि आदित्य तरे (३७) यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करताना सातव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. आदित्य बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरच्या (१५) साथीने बिश्तने १३व्या षटकांत संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला.

परंतु १४व्या षटकांत फिरकीपटू शाहबाज अहमदने एकाच षटकात बिश्त आणि अय्यर यांना माघारी धाडून सामन्याच चुरस निर्माण केली. तर त्यापुढच्याच षटकात ऑफस्पिनर अर्णब नंदीने लागोपाठच्या चेंडूवर सिद्धेश लाड आणि शिवम दुबे यांना भोपळाही फोडू न देता बाद केले. त्यामुळे १ बाद १०२ वरून मुंबईची ५ बाद १०५ अशी घसरगुंडी उडाली.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या साथीला मैदानावर उतरलेल्या शुभमने मग फलंदाजीतही कमाल दाखवून अखेपर्यंत किल्ला लढवला. अयान घोषने टाकलेल्या डावाच्या शेवटच्या षटकात ११ धावांची आवश्यकता असताना सूर्यकुमारही(२२) बाद झाला. परंतु २५ वर्षीय शुभमने न डगमगता अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना यष्टिरक्षकच्या बाजूने रिव्हर्स स्वीपचा फटका लगावून चौकार वसूल केला आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शुभमने १७ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या.

केदारच्या अर्धशतकामुळे महाराष्ट्राची हैदराबादवर मात

चंदीगड : केदार जाधवने (६८) साकारलेल्या दमदार अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादला सहा गडी राखून धूळ चारली. ‘क’ गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राचा हा पाच सामन्यांतून तिसरा विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करताना बावंका संदीप (नाबाद ५५) आणि हिमालय अगरवाल (३४) यांच्या उपयुक्त योगदानामुळे हैदराबादने ६ बाद १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात केदारने नौशाद शेखसह (३४) तिसऱ्या गडय़ासाठी ९५ धावांची भर घालून महाराष्ट्राला १९.५ षटकांत विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : बंगाल : २० षटकांत ४ बाद १५३ (विवेक सिंग ५६, श्रीवत्स गोस्वामी ४३; शुभम रांजणे ३/१७) पराभूत वि. मुंबई : २० षटकांत ७ बाद १५४ (जय बिश्त ४८, शुभम रांजणे नाबाद ३०; अर्णब नंदी २/९). ल्ल  गुण : मुंबई ४, बंगाल ०

*  आजचा सामना – मुंबई वि. मेघालय

*  वेळ : दुपारी २ वा.   *  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २