उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्यामुळे घालण्यात आलेली आठ महिन्यांची बंदीची शिक्षा भोगून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉ याने रविवारी आणखी एक धडाकेबाज खेळी साकारली. त्याने ३६ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६४ धावा केल्यामुळे मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीमधील ‘ब’ गटात मुंबईने झारखंडचा पाच चेंडू आणि पाच गडी राखून पराभव केला.

मुंबईने नाणेफेक जिंकून झारखंडला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर कुमार देवब्रत (५८) आणि कर्णधार सौरभ तिवारी (२७) यांनी ८५ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यानंतर सुमित कुमारने ३३ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंडने २० षटकांत ५ बाद १७० अशी धावसंख्या उभारली.

मग मुंबईकडून पृथ्वीने आदित्य तरेच्या (२१) साथीने ८२ धावांची दिमाखदार सलामी नोंदवली. मुंबईच्या डावाच्या १२व्या षटकात सोनू सिंगने पृथ्वीचा त्रिफळा उडवला. त्या वेळी मुंबईला विजयासाठी आणखी ७८ धावांची आवश्यकता होती. परंतु शिवम दुबे (११ चेंडूंत २३ धावा), सिद्धेश लाड (१० चेंडूंत नाबाद १८ धावा) आणि सुजित नायक (१२ चेंडूंत नाबाद १७ धावा) यांनी वेगवान धावा करीत मुंबईला जिंकून दिले.

संक्षिप्त धावफलक

झारखंड : २० षटकांत ५ बाद १७० (कुमार देवब्रत ५८, सुमित कुमार ३३; शुभम रांजणे २/१७) पराभूत वि. मुंबई : १९.१ षटकांत ५ बाद १७१ (पृथ्वी शॉ ६४, शिवम दुबे २३; सोनू सिंग २/३४)

महाराष्ट्राच्या विजयात अझिम चमकला

सूरत : अझिम काझीच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्यावर ६७ धावांनी शानदार विजय मिळवत सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळी ‘अ’ गटात पहिल्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १६५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर बडोद्याचा डाव १७.३ षटकांत फक्त ९८ धावांत आटोपला. कर्णधार केदार देवधरने सर्वाधिक २७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छावने लक्षवेधी गोलंदाजी करताना ५ धावांत २ बळी घेतले, तर समाद फल्लाहने १२ धावांत २ बळी घेतले. याशिवाय शामसुझामा काझी आणि अझिम काझी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.