भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील पहिली कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. संघाला दमदार सलामी मिळवून देणारा आणि सातत्याने धावा करणारा मुरली विजय दुखापतग्रस्त असल्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. विजयच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. विजयच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि लोकेश राहुल भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
‘‘विजय पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो दुखापतीतून सावरत आहे. येथील वातावरणात आणि निसरडय़ा खेळपट्टींवर त्याला खेळवून आम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. तो चांगल्या फॉर्मात होता आणि आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्याच्याकडे मोठी खेळी साकारण्याची क्षमता आहे आणि त्याच्या अनुभवाची उणीव भासेल,’’ अशी प्रतिक्रिया संघ संचालक रवी शास्त्री यांनी दिली. श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्धच्या लढतीत विजय दोन्ही डावात खेळू शकला नव्हता.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश दौऱ्यावर विजयने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्याने ३२ कसोटीत ४१.७५च्या सरासरीने २३३८ धावा केल्या आहेत आणि त्यात सहा शतकांचा समावेश आहे.
भारत या कसोटीत पाच गोलंदाजांसह उतरणार असल्याची शक्यता असली तरी अंतिम निर्णय खेळपट्टी पाहूनच घेतला जाणार असल्याचे शास्त्रींनी स्पष्ट केले. तसेच रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावरच खेळणार असल्याचे संकेत शास्त्रींनी दिल्याने चेतेश्वर पुजाराला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळणे कठीण झाले आहे.
शास्त्री म्हणाले, ‘‘ पाच गोलंदाज खेळवणे हा नेहमीच पहिला पर्याय आहे. सामन्याअखेर तुम्ही २० बळी टिपू शकलात तरच विजय निश्चित होतो. त्या दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक आहे.’’