ढाका : कसोटी क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावणारा मुशफिकर रहीम हा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे. या बळावर बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला आहे.

मुशफिकरच्या नाबाद २१९ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर बांगलादेशने आपला पहिला डाव ७ बाद ५२२ धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेपर्यंत झिम्बाब्वेने एक बाद २५ धावा केल्या. हॅमिल्टन मासाकाझाने १४ धावांवर तैजूल इस्लामला तंबूत पाठवले.

मुशफिकरने ४२१ चेंडूंत १८ चौकार व एका षटकारासह आपली खेळी साकारली. त्याने मेहदी हसनसोबत आठव्या विकेटसाठी १४४ धावांची नाबाद भागीदारी रचली. झिम्बाब्वेच्या कायले जाव्‍‌र्हिसने ७१ धावांत ५ बळी घेतले.