मुश्ताक अली क्रिकेट

गतउपविजेत्या महाराष्ट्राने शुक्रवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटातील सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध आठ धावांनी निसटता विजय मिळवला.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने १५ षटकांत जेमतेम ६ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. अझिम काझी (४४) आणि अनुभवी केदार जाधव (२७) यांनी महाराष्ट्रासाठी सर्वाधिक योगदान दिले. प्रत्युत्तरात समद फल्लाह (२/२०) आणि मुकेश चौधरी (२/१०) यांच्या भेदक वेगवान माऱ्यापुढे रेल्वेचा डाव कोसळला. २७ धावांत चार फलंदाजांना माघारी पाठवल्यावर मग कर्णधार त्रिपाठी आणि सत्यजित बच्छाव या फिरकीपटूंच्या जोडीनेसुद्धा प्रत्येकी दोन बळी मिळवले.

हर्ष त्यागी (नाबाद २८) आणि टी प्रदीप (२७) यांनी आठव्या गडय़ासाठी ४७ धावांची भर घातल्याने रेल्वेला किमान नव्वदीच्या घरात पोहचता आले. परंतु १५ षटकांत त्यांना ८ बाद ९६ धावाच करता आल्या. शनिवारी महाराष्ट्राचा यजमान चंडीगडशी सामना रंगणार आहे.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : १५ षटकांत ६ बाद १०४ (अझिम काझी ४४, केदार जाधव २७; कृष्णकांत उपाध्याय ३/१२) विजयी वि. रेल्वे : १५ षटकांत ८ बाद ९६ (हर्ष त्यागी नाबाद २८, टी प्रदीप २७; मुकेश चौधरी २/१०, राहुल त्रिपाठी २/१२).