बडोद्याने शनिवारी एलिट क गटातील साखळी लढतीत महाराष्ट्राचा ६० धावांनी पराभव करत सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखली. बडोद्याचा हा सलग चौथा विजय ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हंगामी कर्णधार केदार देवधर याने ७१ चेंडूंत साकारलेल्या ९९ धावांच्या नाबाद खेळीमुळे बडोदा संघाने ४ बाद १५८ धावा उभारल्या. त्यानंतर बडोद्याचा वेगवान गोलंदाज अतित शेठ याने महाराष्ट्राला एकापाठोपाठ हादरे देत त्यांचा डाव ९८ धावांवर गुंडाळला. या विजयासह बडोद्याने चार गुणांची कमाई केली. याआधीच्या सामन्यात बडोद्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगढ यांच्यावर विजय मिळवले.

कर्णधार कृणाल पंड्या यांच्या वडिलांचे निधन झाल्याने देवधर याच्याकडे बडोद्याचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्याने ११ चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी करत बडोद्याला चांगली सुरुवात करून दिली.

प्रत्युत्तरादाखल, महाराष्ट्राला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. सलामीवीर स्वप्निल गुगले (०) आणि ऋतुराज गायकवाड (१) स्वस्तात माघारी परतल्यानंतर नौशाद शेख (३२) आणि केदार जाधव (२५) यांनी विजयासाठी प्रयत्न केले. पण महाराष्ट्राचा डाव १६.५ षटकांत ९८ धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक

बडोदा : २० षटकांत ४ बाद १५८ (केदार देवधर नाबाद ९९, विष्णू सोलंकी २८; तरनजितसिंह ढिल्लो २/३०) विजयी वि. महाराष्ट्र : १६.५ षटकांत ९८ (नौशाद शेख ३२, केदार जाधव २५; अतित शेठ ४/१७).