मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

नामांकित फलंदाजांनी सजलेल्या मुंबईला सय्यद मुस्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. डावखुरा अष्टपैलू शिवम दुबेने (४२ चेंडूंत ६३ धावा) दिलेल्या कडव्या झुंजीनंतरही दिल्लीने मुंबईला ७६ धावांनी धूळ चारली.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने दिलेल्या २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १८.१ षटकांत १३० धावांत आटोपला. दुबेव्यतिरिक्त मुंबईचा एकही फलंदाज २०पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव (७), यशस्वी जैस्वाल (०), आदित्य तरे (३), सिद्धेश लाड (४) यांनी निराशा केल्यामुळे मुंबईची एक वेळ ४ बाद १७ धावा अशी अवस्था झाली होती. यातून मुंबईला अखेपर्यंत सावरणे जमलेच नाही. दिल्लीसाठी प्रदीप सांगवानने तीन, तर दुखापतीतून सावरणाऱ्या इशांत शर्माने दोन बळी मिळवले.

तत्पूर्वी, नितीश राणा (३७ चेंडूंत ७४ धावा) आणि हिम्मत सिंग (३२ चेंडूंत ५३ धावा) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी रचलेल्या १२२ धावांच्या भागीदारीमुळे दिल्लीने २० षटकांत ४ बाद २०६ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार शिखर धवननेसुद्धा दिल्लीसाठी २३ धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली : २० षटकांत ४ बाद २०६ (नितीश राणा ७४, हिम्मत सिंग ५३; शाम्स मुलानी २/४३) विजयी वि. भारत : १८.१ षटकांत सर्व बाद १३० (शिवम दुबे ६३, सर्फराज खान १५; प्रदीप सांगवान ३/२०, इशांत शर्मा २/१६)