मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी कर्णधार सूर्यकुमार यादवची (३८ चेंडूंत, नाबाद ८१ धावा) बॅट तळपली. त्याने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत हरयाणाचा आठ गडी आणि २६ चेंडू राखून धुव्वा उडवला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला.

हरयाणाचे सलामीवीर हर्षल पटेल (३३) आणि शिवम चौहान (२८) यांनी ६६ धावांची भागीदारी रचून दमदार सुरुवात केली. त्यानंतर हरयाणाला २० षटकांत ५ बाद १५३ धावा करता आल्या.

प्रत्युत्तरादाखल सलामीवीर जय बिश्त (१३) आणि आदित्य तरे (३९) बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूंत तब्बल ११ चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांसह नाबाद ८१ धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईने १५.४ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले.