‘एमसीए’चे कार्यकारिणी सदस्य नदीम मेमन यांची ‘बीसीसीआय’कडे मागणी

मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा मुंबईत आयोजित करावी. या स्पध्रेसाठी पुरेशी मैदाने या शहरात उपलब्ध आहेत, अशी मागणी मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) कार्यकारिणी सदस्य नदीन मेमन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

‘‘भारतीय क्रिकेट हंगामाचा प्रारंभ मुश्ताक अली स्पध्रेने करता येईल. मुंबई या स्पध्रेची संपूर्णत: जबाबदारी उचलू शकेल. कारण मुंबईत सहा उत्तम दर्जाची क्रिकेट स्टेडियम्स आणि चांगली हॉटेल्स आहेत,’’ असे मेमन यांनी गांगुलीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘‘मुंबईत असलेल्या स्टेडियम आणि हॉटेल्सच्या सुविधांमुळे सर्व ‘बीसीसीआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची चांगली काळजी घेतली जाईल. मुंबईने फेब्रुवारी-मार्चमध्ये महिलांची अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा २० दिवसांत यशस्वीपणे आयोजित केली होती,’’ असे मेमन यांनी म्हटले आहे.

‘‘उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट आहे. त्यामुळे या स्पध्रेचा सकारात्मक पद्धतीने विचार करावा. मुंबई मुश्ताक अली स्पध्रेसाठी जैव-सुरक्षित वातावरणाची निर्मिती केली जाईल,’’ असे मेमन यांनी सांगितले.

अशोक मल्होत्रा यांच्याकडून स्वागत

भारतीय क्रिकेटर्स संघटनेचे प्रमुख अशोक मल्होत्रा यांनी मेमन यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. ‘‘स्थानिक क्रिकेट हे नोकरी नसलेल्या अनेक क्रिकेटपटूंसाठी संजीवनी देणारे ठरते. त्यामुळे बहुसुविधा असलेल्या मुंबई, आंध्र प्रदेश, केरळ किंवा बंगळूरु यांच्यासारख्या एखाद्या शहरात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करता येईल,’’ असे मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

मुंबईतील स्टेडियम्स

वानखेडे स्टेडियम (चर्चगेट), शरद पवार इनडोअर अकादमी (वांद्रे-कुर्ला संकुल), सचिन तेंडुलकर जिमखाना (कांदिवली), डी. वाय. पाटील स्टेडियम (नवी दिल्ली), दादोजी कोंडदेव स्टेडियम (ठाणे)