करोनामुक्तीनंतर क्रिकेटमधील कोणताही स्पर्धात्मक सामना खेळवण्याआधी किमान एक महिन्याचा सराव आवश्यक आहे, असे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने बुधवारी व्यक्त केले.

करोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे सामन्याआधी आणि नंतरच्या क्रिकेटपटूंच्या दैनंदिन कार्यप्रणालीत कमालीचा बदल होईल, असे रहाणेने सांगितले.

‘‘देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणताही स्पर्धात्मक सामना खेळण्याआधी क्रि केटपटूला किमान तीन ते चार आठवडय़ांचा योग्य सराव करणे आवश्यक आहे. फलंदाजीचा सराव सध्या करता येत नसल्याची उणीव तीव्रतेने भासते आहे; परंतु करोनावरील लसीचे संशोधन झाल्यावरच क्रिकेट पुन्हा सुरू होऊ शकेल,’’ अशी आशा रहाणेने व्यक्त केली.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या क्रीडापटूंच्या राष्ट्रीय शिबिराला प्रारंभ करण्यासंदर्भात योजना जाहीर केली आहे; परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेटविषयक कोणत्याही योजना घोषित के लेल्या नाहीत. टाळेबंदीच्या या कालखंडात रहाणेने तंदुरुस्तीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

‘‘आमच्या सराव मार्गदर्शकाने दिलेल्या तक्त्यानुसार माझी दिनचर्या सुरू आहे. वजन उचलण्याच्या व्यायामासह ध्यानधारणाही सुरू आहे,’’ असे रहाणेने सांगितले.

‘‘मैदानावर खेळ पुन्हा सुरू झाल्यावर कोणत्याही गोष्टी गृहीत धरता येणार नाहीत. चाहत्यांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची असेल. प्रवास करतानाही जीवनशैलीत बदल दिसून येईल,’’ अशी भूमिका रहाणेने मांडली.

करोनाच्या काळात सकारात्मकता महत्त्वाची असल्याचे ६५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या रहाणेने सांगितले. ‘‘टाळेबंदीच्या कालखंडाने अधिक संयमाचा महत्त्वाचा धडा दिला. माझी दिनचर्या विश्वासाने सुरू आहे. याचे उत्तम फळ भविष्यात मिळेल,’’ असा आशावादही रहाणेने प्रकट केला.

हस्तांदोलनाच्या जागी नमस्ते!

भविष्यात मैदानावर बळी मिळाल्यानंतर किंवा विजयानंतर आक्रमक जल्लोष किंवा समूह आलिंगन पाहायला मिळणार नाही, असे रहाणेने सांगितले. ‘‘कदाचित करोनामुक्तीनंतर क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या मैदानावरील आवेशाला मर्यादा येतील. बळी मिळाल्यावर क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरूनच टाळ्या वाजवून कौतुक करतील. हस्तांदोलनाच्या जागी नमस्ते म्हटले जाईल,’’ असे रहाणे म्हणाला.

करोनामुक्तीनंतर सुधारित नियम!

करोनानंतर क्रिकेटमध्ये चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करावा का, या चर्चेपासून दूर राहाणेच रहाणेने पसंत केले. ‘‘मी याबाबत मत मांडण्याची घाई करणार नाही. मैदानावर क्रिकेट परतेल, तेव्हा काही सुधारित नियम लागू करण्यात येतील,’’ असे रहाणेने सांगितले.