विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतर आयोजित पुरस्कार सोहळ्यात मुस्तफा कमाल आयसीसी अध्यक्ष म्हणून उपस्थित होणार होते. मात्र पंच आणि सामनाधिकाऱ्यांसंदर्भातील आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी त्यांनी माफी न मागितल्याने त्यांची पुरस्कार सोहळ्यातून हकालपट्टी करण्यात आली, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे.
बांगलादेशने भारताविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत गमावली. या लढतीत रोहित शर्माला पंचांनी नाबाद ठरवले होते. या निर्णयावर कमाल यांनी आक्षेप घेतला होता. पंचांच्या सहकार्यामुळेच भारताचा संघ विजयी ठरला आणि बांगलादेशचे स्वप्न धुळीस मिळाले असे वक्तव्य अध्यक्षस्थानी असलेल्या कमाल यांनी केले होते.
मानद पदाचे शिष्टाचारांचे भंग करणे, खेळात बाधा आणणे आणि अध्यक्षपदी असतानाही संघटनेच्या भूमिकेशी फारकत घेणारे वक्तव्य करणे या कलमांखाली आयसीसीच्या संविधानानुसार कमाल यांची विश्वचषकाच्या अंतिम लढतीपूर्वीच अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली जाऊ शकत होती. मात्र टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आयसीसीने संयमी धोरण स्वीकारले. कमाल यांनी चुक मान्य करत माफी मागण्याची संधी आयसीसीने दिली. मात्र तसे करण्यास कमाल यांनी स्पष्ट नकार दिला.