मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) अखेर भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री आणि वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर सुधीर नाईक यांच्यामध्ये सामंजस्य करार घडवण्यात यशस्वी ठरली. एमसीएचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी शास्त्री आणि नाईक या दोघांचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर नाईक यांनी आपली तक्रर मागे घेत या प्रकरणाला पूर्णविराम दिला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये २५ ऑक्टोबरला वानखेडे स्डेडियमवर एकदिवसीय सामना झाला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने ४३८ धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर शास्त्री यांनी आपल्याला अपशब्द वापरल्याची तक्रार नाईक यांनी केली होती. याबाबतची तक्रार त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली होती.
या दोघांमध्ये सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी एमसीएने वेंगसरकर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर वेंगसरकर यांनी दोघांशी चर्चा केली. त्यानुसार हा वाद गैरसमजुतीतून झाल्याचा निष्कर्ष निघाला असून नाईक यांनी आपली तक्रार मागे घेतली.