जगभरामध्ये १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू यांची रेलचेल असते. आजच्या डिजीटल युगामध्ये हॅशटॅग, फोटो आणि स्टेटसच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याचे प्रमाण वाढले आहे. आज अनेकजण आपल्या प्रेमाची खुलेपणाने कबुली देतात. भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही आज व्हॅलेंटाइन डेनिमित्त आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे हे पहिले प्रेम म्हणजे त्याच्या आयुष्यातील कोणीही व्यक्ती नसून त्याहून खास गोष्ट आहे.

सचिन तेंडुलकरने आज व्हॅलेंटाइन डे निमित्त एक ट्विट केलं आहे. या ट्विटला त्याने “माझं पहिले प्रेम” अशी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शननंतर सचिनने एक हसण्याचा इमोन्जीही पोस्ट केला आहे. सचिनने ज्या गोष्टीला आपलं पहिलं प्रेम म्हटलं आहे ती गोष्ट आहे अर्थात क्रिकेट. सचिनने केलेल्या ट्विटमध्ये तो नेटमध्ये क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओत सचिन स्टेट ड्राइव्ह मारताना दिसत आहे.

सचिन नुकताच ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बुशफायर क्रिकेट लीग स्पर्धेतील सामन्यात खेळताना दिसला होता. लवकरच सचिन आणि ब्रायन लारा हे दोघे रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एकमेकांशी लढणार आहेत. भारत लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स या संघांमध्ये ७ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सलामीचा सामना रंगणार आहे, तर अंतिम सामना २२ मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.