भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आगामी २०२० टोकीयो ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. Gulf News ला दिलेल्या मुलाखतीत सानिया मिर्झाने आपल्या पुनरागमनाबद्दल संकेत दिले आहेत. सानिया मिर्झा सध्या गरोदरपणामुळे टेनिस कोर्टपासून दूर आहे.
सानियाने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. किम क्लस्टर्स, सेरेना विल्यम्स यासारख्या खेळाडूंनीही गरोदरपणानंतर मैदानात पुनरागमन करत सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. आपण सध्या याच खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असल्याचं सानिया मिर्झा म्हणाली. बाळ झाल्यानंतर सराव करुन मैदानात पुनरागमन करणं ही सोपी गोष्ट नाही, मात्र सेरेनाने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे आपल्यासमोरही २०२० टोकीयो ऑलिम्पिकचं लक्ष्य असल्याचं सानिया म्हणाली.
सानियाचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानचा क्रिकेटपटू आहे. आम्ही दोघंही खेळाडू असल्यामुळे जय-पराजय या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलानेही भविष्यात असाच आत्मविश्वास कमवावा अशी इच्छा सानियाने व्यक्त केली. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमी लढत रहायचं शिकवलं आहे. त्यामुळे गरोदरपणानंतर माझं बाळ ही माझी पहिली जबाबदारी असली तरीही टेनिसकडे माझं कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी मी घेईन, असंही सानिया म्हणाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2018 11:40 am