‘‘गुडघ्याच्या दुखापतीने गेल्या वर्षीच्या पूर्वार्धात चालणे-फिरणेही कठीण झाले होते. त्यावर मात करून खेळायला प्रारंभ केला. परंतु श्रीनगरमध्ये होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी सुरू असतानाच पायाच्या घोटय़ाने असहकार पुकारला. त्यातून जेमतेम सावरत पुन्हा खेळायला सुरुवात केली आणि मांडीचे स्नायू दुखावले. एकामागोमाग एक होणाऱ्या या दुखापतींच्या हादऱ्यांनी मी अक्षरश: खचून गेले. घरच्यांनाही माझी तीव्रपणे काळजी वाटू लागली. त्या वेळी बॅडमिंटन सोडायच्या निर्णयापर्यंत मी आले होते. मग जीमॅट परीक्षेची तयारीही सुरू झाली. मात्र ज्या खेळाने मला भरभरून दिले, त्या खेळाच्या प्रेमापोटी मी कोर्टवर पुन्हा परतले,’’ अशा शब्दांत बॅडमिंटनपटू आदिती मुटाटकरने आपल्या खडतर प्रवासाची कहाणी सांगितली. दुखापतींवर यशस्वी मात करीत आदितीने बुधवारी खार येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले.
‘‘पुण्यात झालेल्या व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठल्यामुळे आपण अजूनही स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळू शकतो, हा विश्वास मिळाला आणि नव्या उमेदीने खेळायला सुरुवात केली,’’ असे आदितीने सांगितले. दीड वष्रे दुखापतीचा ससेमिरा तिच्या पाठीशी लागला होता. परंतु तिने त्याची तमा न बाळगता झोकात पुनरागमन केले आहे. या दुखापतींच्या आधीही आदितीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. सध्या देशभरात इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल)चे वातावरण भारतीय बॅडमिंटनपटूंना प्रसिद्धी आणि आर्थिक सधनता मिळवून देत आहे. परंतु याच वेळी आदिती मात्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पुनरागमनासाठी सरसावली आहे.
‘‘दुखापतींना मागे टाकून परतणे सोपे नव्हते. आई-वडील आणि सरावतज्ज्ञ दर्शन वाघ यांच्या भरीव पाठिंब्यामुळे पुन्हा कोर्टवर परतू शकले. दुखापतींवर मात केल्यानंतर ज्येष्ठ प्रशिक्षक वसंत गोरे यांच्याकडे जाऊन मूलभूत कौशल्यांचा सराव सुरू केला,’’ असे आदितीने सांगितले.
‘‘जागतिक क्रमवारीत अव्वल ५० खेळाडूंमध्ये मी स्थान पटकावले होते. राष्ट्रीय जेतेपदे नावावर होती, मात्र दुखापतींनी मला पिछाडीवर नेले. अनुभवी खेळाडू असूनही मी नव्याने सुरुवात करीत आहे. अन्य खेळाडूंशी तुलना करून मला चालणार नाही. राज्यस्तरीय, राष्ट्रीय असे टप्पे करीतच आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत पोहोचणार आहे,’’ असा विश्वास आदितीने या वेळी व्यक्त केला.
‘‘दुखापतींमुळे काही फटक्यांवर र्निबध आले आहेत. मात्र त्याने माझ्या खेळावर परिणाम होणार नाही. पुन्हा दुखापत होऊ नये यासाठी एका वर्षांत किती स्पर्धा खेळायच्या, कधी विश्रांती घ्यायची याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. दुखापतींचे व्यवस्थापन या संदर्भात जागृती होणे गरजेचे आहे. खेळाडू जिंकत असताना सगळे त्याच्या साथीला असतात. मात्र दुखापतींनी घेरल्यावर तो एकटा असतो,’’ अशी खंतही आदितीने प्रकट केली.
‘‘भारतीय बॅडमिंटनचा सुवर्णकाळ सध्या सुरू आहे. ‘आयबीएल’ची संकल्पना खूपच चांगली आहे. मात्र या स्पर्धेचे नियोजन दर्जात्मक असायला हवे. राष्ट्रीय विजेती असूनही सायली गोखले आयबीएलमध्ये नाही, अशा गोष्टी घडायला नकोत,’’ अशी भूमिकाही आदितीने मांडली.