भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे गेली दोन वर्ष भारतीय वन-डे संघापासून दूर आहे. अनेक माजी खेळाडूंनी चांगली कामगिरी करुनही अजिंक्यला संघात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परंतू अजिंक्यने वन-डे संघात पुनरागमनाबद्दलची आशा सोडलेली नाहीये. आपण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी स्वतःला तयार करत असल्याचं अजिंक्यने सांगितलं. तो ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“वन-डे संघात मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. मग सलामीची जागा असो किंवा चौथ्या क्रमांकावरची जागा…मी तयार आहे. माझं मन मला सांगतंय की मला वन-डे संघात पुनरागमन करायचंय. पण ही संधी कधी मिळेल हे मला माहिती नाही. माझ्याकडून मी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची तयारी करतो आहे. स्वतःबद्दल सकारात्मक राहणं मला नेहमी आवडतं.” अजिंक्यने आपला आशावाद बोलून दाखवला.

अवश्य वाचा – दुधात पडलेली माशी बाहेर काढतात तसं अजिंक्यला वन-डे संघातून बाहेर काढलं !

अजिंक्यने आतापर्यंत ९० वन-डे सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१८ साली अजिंक्य अखेरचा वन-डे सामना खेळला. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. मात्र भारतीय वन-डे संघात पुनरागमन करणं अजिंक्यसाठी सोपं नसणार आहे. चौथ्या क्रमांकाच्या जागेवर श्रेयस अय्यर, लोकेश राहुल या खेळाडूंसोबत अजिंक्यला स्पर्धा करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही अजिंक्यला भारतीय वन-डे संघात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.