लागोपाठ दोन वन-डे सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी मात केली. कांगारुंनी २-१ च्या फरकाने सामना जिंकला असला तरीही तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताच्या युवा गोलंदाजांनी केलेली कामगिरी ही वाखणण्याजोगी होती. मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने ३ बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने शार्दुलला संधी द्यावी अशी मागणी होत होती, परंतू विराटने दुसऱ्या सामन्यात संघात बदल केले नाहीत.

तिसरा सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत शार्दुल ठाकूरला त्याला मिळत असलेल्या कमी संधींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्याला उत्तर देताना शार्दुलने आपलं मत मांडलं. “संघनिवड करणं हे माझ्या हातात नाही. पण ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी संघ जिंकेल यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो हे महत्वाचं आहे. मी हा विचार मनात ठेवून मैदानात उतरतो. मला केवळ एकच सामना मिळतोय किंवा इतर कोणीतरी दुखापतग्रस्त झाल्यावर मग मला त्याच्याजागेवर संधी मिळतेय याचा मी विचार करत नाही, मी जिंकायच्या दृष्टीकोनाने खेळतो.”

३ वर्षांच्या काळात शार्दुल ठाकूर भारतीय संघाकडून फक्त १२ वन-डे सामने खेळला आहे. वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी शार्दुल ठाकूरला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.