सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत समस्त देशवासियांना आपल्या खेळीने संमोहीत करुन टाकलं होतं. ज्या-ज्या वेळी सचिन मैदानात फलंदाजीसाठी यायचा त्यावेळी चाहते सचिनssss, सचिनssss च्या जयघोषाने अख्खं मैदान दणाणून सोडायचे. मात्र या जयघोषामागची खरी कहाणी सचिनने नुकतीच सांगितली आहे.

“तुम्हाला सचिनssss, सचिनssss मागची खरी कहाणी माहिती आहे का?? माझ्या आईने पहिल्यांदा हे सुरु केलं असं मी म्हणेन…मी ५ वर्षांचा असेन माझ्या कॉलनीतल्या मित्रांसोबत मी क्रिकेट खेळायचो. संध्याकाळी साडेसात वाजून गेले तरीही मी घरी आलो नाही की आई घराच्या बाल्कनीत यायची आणि सचिन…सचिन आता वर ये असं सारखं ओरडायची.” सचिन India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

मी लहानपणी असताना कधीही धावा मोजायचो नाही. धावा मोजल्या की तुम्ही बाद होता अशी माझी अंधश्रद्धा होती. हिच गोष्ट सचिनssss, सचिनssss बद्दल लागू होते. मी कोणतीही गोष्ट मोजत गेलो नाही….जे मिळालं ते घेत गेलो. वानखेडे मैदानावर आई माझा अखेरचा कसोटी सामना पहायला आली होती, माझ्यासाठी तो प्रसंग शब्दांत न मांडता येणारा होता. तिने मला प्रत्यक्ष मैदानावर खेळताना कधीच पाहिलं नव्हतं, तिने एकदातरी मला मैदानावर खेळताना पहावं अशी माझी इच्छा होती आणि अखेरीस ती पूर्ण झाली, सचिन आपल्या आईबद्दल बोलत होता.