राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावता न आल्याची निराशा नक्कीच आहे, मात्र आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचे लक्ष्य आहे, असे युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने सांगितले.
सायना नेहवालच्या अनुपस्थितीत सिंधूवर महिला एकेरीची जबाबदारी होती. सुवर्णपदकासाठी शर्यतीत असणाऱ्या सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याबाबत सिंधू म्हणाली, ‘‘ग्लासगोमध्ये झालेल्या चुका टाळणे हे माझे उद्दिष्ट आहे. सुवर्णपदकावर नाव न कोरता आल्याची खंत आहेच, मात्र या स्थितीतून बाहेर येत मला खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे. खेळाडूच्या आयुष्यात असे चढउतार होतच असतात.’’
ती पुढे म्हणाली, ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खूपच कमी वेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी तंदुरुस्त आहे. मला माझ्या फटक्यांमधील वैविध्यावर काम करायचे आहे.’’