जवळपास तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी रॉजर फेडरर आतुर आहे. अमेरिकन खुल्या स्पर्धेत उन्हाचा प्रकोप आणि अव्वल प्रतिस्पर्धी यांच्यासमोर शरणागती पत्करत असंख्य खेळाडूंनी गाशा गुंडाळला आहे. मात्र ३३ वर्षांच्या फेडररने एकही सेट न गमावता उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. युवा खेळाडूंना लाजवेल अशा ऊर्जेने खेळणाऱ्या फेडररला पाहून असंख्य टेनिसप्रेमी चकित झाले आहेत, मात्र स्वत: फेडररला या विजयी वारूचे जराही आश्चर्य वाटत नाही.
‘‘मी र्सवकष परिस्थितीचा विचार करतो. कदाचित यामुळेच प्रदीर्घ काळ अव्वल दर्जाचे टेनिस खेळू शकलो आहे. त्यामुळे तिशी ओलांडल्यानंतरही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम चापर्यंत मजल मारणे यात मला काही विशेष वाटत नाही,’’ असे फेडररने सांगितले.
अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची फेडररची ही दहावी वेळ असणार आहे. या स्पर्धेच्या सहाव्या, तर एकूण अठराव्या ग्रँड स्लॅमसाठी फेडरर सज्ज आहे. २०१२मध्ये फेडररने विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरले होते. तीन वर्षे ग्रँड स्लॅम जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली आहे. अमेरिकन खुल्या स्पर्धेची तयारी म्हणून आयोजित सिनसिनाटी स्पर्धेत फेडररने जोकोव्हिचवर मात करत जेतेपदावर कब्जा केला होता. तोच फॉर्म कायम राखत फेडररने उपांत्य फेरी गाठली आहे आणि आता जेतेपद केवळ दोन विजय दूर आहे. कारकिर्दीत ग्रँड स्लॅम जेतेपदापासून फेडरर सर्वाधिक काळ दूर आहे. फेडररने आपल्या रॅकेटमध्ये बदल केला व दिग्गज खेळाडू स्टीफन एडबर्ग यांना आपल्या प्रशिक्षक ताफ्यात समाविष्ट करून घेतले. अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने फेडररने एक नव्या स्वरूपाचा फटकाही अंगीकारला आहे. प्रतिस्पध्र्याच्या दुसऱ्या सव्‍‌र्हिसला प्रत्युत्तर देताना झटपट पुढे जाऊन चेंडूवर नियंत्रण मिळवत हल्लाबोल करण्याचे तंत्र फेडररने विकसित केले आहे. सामन्यादरम्यान ताजेतवाने राहण्यासाठी फेडररने निद्रा कालावधी १० तासांवर नेला आहे.
या विविध बदलांविषयी विचारले असता फेडरर म्हणाला, ‘‘मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे. प्रतिस्पध्र्याकडून फटकावला जाणारा फटका मी झटपट परतवतो आहे. गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम व्हॉलीजचा खेळ मी करतो आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी स्वत:ला तंदुरुस्त, ताजेतवाने आणि प्रेरणादायी राखणे आवश्यक असते. गेल्या दीड ते दोन वर्षांत मी चांगला खेळतो आहे. त्यामुळे वय झाले आहे असे मला जाणवलेले नाही, उलट अजूनही तरुण असल्यासारखेच वाटते.’’