भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा अजूनही वन-डे संघात पुनरागमन करण्याचं स्वप्न बाळगून आहे. २०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात आपल्याला स्थान मिळावे, यासाठी साहा प्रयत्नशील आहे.

“मी विश्वचषकात खेळावं असं माझ्या पत्नीला मनापासून वाटतंय. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी वन-डे संघात जागा मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेन. संघात निवड होण्यासाठी जास्त वेळ सराव करण्याचा सल्ला ती देत असते, त्याप्रमाणे मी मैदानात सरावही करतोय. मात्र अंतिम निर्णय हा निवड समितीचा असेल”, असे साहा याने सांगितले.

आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबद्दलही साहाने आपली मते मांडली. ” भारतात येऊन भारताला हरवणं सोपं नाही. याआधी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला एका कसोटीत हरवलं होतं, तरीही या मालिकेत भारताचं पारड जड आहे. भक्कम फलंदाजी हे भारताचं बलस्थान आहे. २०१९ साठी चांगला संघ बांधला जावा याकरीता, निवड समिती संघामध्ये रोटेशन पॉलिसी अवलंबत आहे. याचा भारताला नक्कीच फायदा होईल, असं साहा म्हणाला.

श्रीलंकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना संधी दिल्याबद्दल साहाने समाधान व्यक्त केलं आहे. प्रत्येक संघासाठी आपल्या राखीव खेळाडूंची ताकद तपासून बघणं महत्वाचं असतं. त्यामुळे नवोदीत खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. यात त्यांनी चांगली कामगिरी केली तर पुढे त्यांची जागा संघात निश्चित मानली जाईल, असंही साहा म्हणाला.