शब्दांपेक्षा बऱ्याचदा स्पर्श आणि हावभाव बरेच काही सांगून जातात. गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विपणन समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्यावर एन. श्रीनिवासन यांच्या चेहऱ्यावर जे स्मित आणि आत्मविश्वास होता, त्यामधून समजणाऱ्याला इशारा पुरेसा होता. या बैठकीमध्ये श्रीनिवासन यांनी काही जिंकले नव्हते, पण अध्यक्षपदी पुन्हा एकदा आपण बिनविरोध निवडून येणार हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. २९ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये आपण बिनविरोध निवडून येऊ, हा विश्वास समीकरणांच्या जोरावर श्रीनिवासन यांना असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन उत्सुक असून, यापूर्वी दोन वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. यंदाच्या आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे व्यवस्थापकीय सदस्य जावई गुरुनाथ मयप्पन याचे नाव आल्याने श्रीनिवासन यांच्यावर दडपण वाढले होते. बीसीसीआयच्या बैठकीमध्ये श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला असला, तरी कामकाजासाठी जगमोहन दालमिया यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नवी दिल् ली येथे झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी आयपीएलमधील दोषी खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
दक्षिण विभागातील सहा पैकी पाच क्रिकेट असोसिएशन्स श्रीनिवासन यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा अध्यक्षपदावर विराजमान होणार असल्याचा आत्मविश्वास आहे. दक्षिण विभागातील सहा असोसिएशन्सपैकी कर्नाटक, केरळ, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि त्यांचा बालेकिल्ला असलेला तामिळनाडू हे श्रीनिवासन यांच्या पाठीशी आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण विभागाच्या संघटनांची एक बैठक बोलावण्यात आली होती, त्या वेळी आंध्र प्रदेश आणि गोवा यांच्या संघटनेतील प्रतिनिधी बैठकीला अनुपस्थितीत राहिले होते. पण काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशच्या संघटकांचे मन आणि मत वळवण्यात श्रीनिवासन यशस्वी झाले आहेत. आता त्यांच्या विरोधात दक्षिण विभागातील फक्त गोव्याची संघटना आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन यांच्या पाठीशी आतापर्यंत ज्या संघटना आहे, त्या आपल्या मतावर ठाम आहेत. त्यामुळे जर श्रीनिवासन यांच्या तोडीस तोड उमेदवार बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिला तर यामध्ये फरक पडू शकतो. पण दक्षिण विभागातील पाच संघटना काही करून श्रीनिवासन यांची साथ सोडणार नाहीत.