फ्रेड्रिक लुमबर्ग आणि निकोलस अनेल्का या खेळाडूंचा टीव्हीवर खेळ पाहून मी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यांनाच आदर्श मानत मी फुटबॉलचे धडे गिरवले. आता लुमबर्ग आणि अनेल्का यांच्यासोबत खेळण्याचे भाग्य मला इंडियन सुपर लीगमुळे मिळाले आहेत. या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असे मुंबई सिटी एफसीचा खेळाडू सय्यद रहीम नबी याने सांगितले.
‘‘अनेल्का आणि लुमबर्ग यांचा मी प्रचंड चाहता आहे. सराव करताना किंवा सामन्यादरम्यान त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळते. तेव्हा मी स्वत:ला भाग्यवान समजतो. परदेशातील खेळाडूंमुळे भारतीय फुटबॉलच दर्जा नक्कीच उंचावणार आहे. परदेशी खेळाडू व भारतीय खेळाडूंमधील दर्जामध्ये बरीच तफावत आहे. प्रतिष्ठेच्या लीगमध्ये खेळून परदेशी खेळाडू आता भारतात आले आहेत. त्यामुळे त्यांना फुटबॉल कसे खेळायचे हे शिकवण्याची गरज नाही, पण त्यांच्याकडून आम्हाला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे. माझ्यासारख्या खेळाडूंसाठी आयएसएल ही फारच मोठी संधी आहे,’’ असे नबी म्हणाला.