तब्बल चाळीस वेळा रणजीचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला त्यांच्याच मैदानात चारी मुंडय़ा चीत करीत जम्मू-काश्मीरने नाचक्की केली. मुंबईच्या दृष्टीने हा ऐतिहासिक पराभव म्हणावा लागेल. कारण गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये असा वर्मी घाव मुंबईला बसलेला नसेल. सामन्याच्या पूर्वी जम्मू-काश्मीर हा मुंबईसाठी सोपा पेपर असल्याचे म्हटले जात होते. पण जवळपास चारही दिवसांवर वर्चस्व राखत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जम्मू-काश्मीरने मुंबईवर चार विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर जम्मू-काश्मीरने विजयानिशी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची बोहणी करीत सहा गुणांची कमाई केली आहे, तर मुंबईच्या पदरात एकही गुण पडलेला नाही. प्रतिकूल परिस्थितीतही घरच्या मैदानात पुरामुळे सराव न करता जम्मू-काश्मीरने मिळवलेले हे देदीप्यमान यश वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल.
२३७ धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी १ बाद ५८ वरून पुढे खेळताना जम्मू-काश्मीरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, ठरावीक फरकाने त्यांचे फलंदाज बाद होत होते. त्यातच पहिल्या डावात शतक झळकावलेल्या शुभम खजुरियाचा ४८ धावांवर असताना धवल कुलकर्णीने झेल सोडला. त्यानंतर त्याने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७८ धावांची खेळी साकारली. कर्णधार परवेझ रसूलनेही (३२) त्याला चांगली साथ दिली. पण उपाहारापूर्वी हे दोघेही बाद झाले. उपाहाराच्या वेळी त्यांची ५ बाद १८३ अशी स्थिती होती आणि त्यांना विजयासाठी ५४ धावांची गरज होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर जम्मू-काश्मीरचे ५७ धावांत तब्बल ८ बळी मुंबईने घेतले होते. त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न मुंबईचा संघ पाहत होता. पण अनुभवी हरदीप सिंगने (नाबाद ४१) मुंबईच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करून मुंबईचे स्वप्न धुळीस मिळवत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : २३६ आणि २५४
जम्मू आणि काश्मीर : २५४ आणि ६९.२ षटकांत ६ बाद २३७ (शुभम खजुरिया ७८, हरदीप सिंग नाबाद ४१; विशाल दाभोळकर २/६६).