उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरण

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था अर्थात ‘नाडा’ने यवतमाळचा हॉकी गोलरक्षक आकाश चिकटे याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. या वर्षी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत प्रतिबंधात्मक उत्तेजके घेतल्याचे सिद्ध झाल्यामुळे आकाशवर ही कारवाई करण्यात आली आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि ढाका येथील आशिया चषक विजेत्या भारतीय संघात आकाश चिकटेचा समावेश होता.

चिकटे याच्यावरील तात्पुरती बंदी २७ मार्चपासून सुरू झाली असून ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीनंतर उत्तेजक विरोधी शिस्तपालन समितीने (एडीडीपी) त्याच्यावर दोन वर्षे कारवाई करण्याचा निर्णय घेतला. २७ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथील राष्ट्रीय हॉकी संघाच्या सराव शिबिरादरम्यान त्याची चाचणी घेण्यात आली. त्या वेळी चिकटे याने नोरानड्रोस्टेरॉन हे प्रतिबंधात्मक उत्तेजक घेतल्याचे समोर आले आहे. डाव्या पायावर झालेल्या दुखापतीवर औषध म्हणून त्याने हे उत्तेजक घेतले होते. त्याने जाणूनबुजून हे उत्तेजक घेतले नसल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे.

चिकटेसह विविध खेळांतील अन्य सहा खेळाडूंवर ‘नाडा’च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. आपल्या शरीरात ही प्रतिबंधात्मक उत्तेजके कुठून आली, हे सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली. कुस्तीपटू अमित, कबड्डीपटू प्रदीप कुमार, वेटलिफ्टर नारायण सिंग, अ‍ॅथलेटिक्सपटू सौरभ कुमार, बलजीत सिंग आणि सिमरजीत सिंग यांचा त्यात समावेश आहे. सर्व खेळाडूंना ‘नाडा’च्या या कारवाईविरोधात तीन आठवडय़ांच्या आत नाडाची सर्वोच्च संस्था असलेल्या उत्तेजक विरोधी अपील समितीकडे (एडीएपी) दाद मागता येणार आहे.