गतविजेत्या जोकोव्हिचचा ३२ मिनिटांत विजय; मारिन सिलिकचा धक्कादायक पराभव

दुखापतीमुळे गेले   दीड वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या राफेल नदालने अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चुणूक दाखवली. २०१३ साली अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या नदालने तब्बल तीन वर्षांनंतर या स्पध्रेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला यावेळी फार संघर्ष करावा लागला नाही. प्रतिस्पर्धी मिखाइल योउझिनीने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे ३२ मिनिटांतच जोकोव्हिचने अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले. २०१४ साली जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मारिन सिलिकला मात्र धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.

शनिवारी झालेल्या लढतींमध्ये नदालच्या सामन्याची सर्वाना उत्सुकता होती. २०१० आणि २०१३ सालची दोन जेतेपद नावावर असलेल्या नदालला येथे गेल्या तीन वर्षांत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. २०१४ साली दुखापतीमुळे त्याने माघार घेतली होती, तर गतवर्षी तिसऱ्या फेरीतच त्याला गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र, यंदा तंदुरुस्त झालेल्या नदालने रशियाच्या अ‍ॅण्ड्रे कुझनेत्सोव्हावर ६-१, ६-४, ६-२ असा सहज विजय मिळवला.  पुढील फेरीत त्याच्यासमोर फ्रान्सच्या लुकास पोउइल्लेचे आव्हान आहे. लुकासने स्पेनच्या रॉबेटरे ऑगटचा ३-६, ७-५, २-६, ७-५, ६-१ असा पराभव केला.

सर्बियाचा जोकोव्हिच पहिल्या सेटमध्ये ४-२ अशा आघाडीवर असताना रशियाच्या ३४ वर्षीय योउझिनीने स्थायू ताणल्यामुळे माघार घेतली आणि जोकोव्हिचला विजयी घोषित करण्यात आले. ‘माझ्या ग्रँड स्लॅम कारकीर्दीत असे कधीच घडले नव्हते. याआधीच्या लढतीत पुढे चाल मिळाली आणि या लढतीत अध्र्या तासात विजय निश्चित झाला,’ असे मत जोकोव्हिचने व्यक्त केले. अव्वल मानांकित जोकोव्हिचला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ब्रिटनच्या कायले एडमुंडचा सामना करावा लागेल. एडमुंडने अमेरिकेच्या जॉन इस्नरचा ६-४, ३-६, ६-२, ७-६ (७-५) असा पराभव करून पहिल्यांचा ग्रँडस्लॅम स्पध्रेच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला.

अमेरिकेच्या २६व्या मानांकित जॅक सॉकने २०१४ साली अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या क्रोएशियाच्या मारिन सिलिकला पराभवाचा झटका दिला. सॉकने ६-४, ६-३, ६-३ अशा फरकाने सहज विजय मिळवत आगेकूच केली. पुढील फेरीत त्याला फ्रान्सच्या जो-विलफ्रिड त्सोंगाचे आव्हान पेलावे लागेल. त्सोंगाने ६-३, ६-४, ७-६(७-४) अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन अँडरसनचा पराभव केला.

महिलांमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने अमेरिकेच्या कॅथरीन बेल्लीसचा ६-१, ६-१ असा, तर चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्वितोव्हाने युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाचा ६-३, ६-४ असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

पेस, बोपन्नाचे आव्हान संपुष्टात, सानियाचा विजय

भारताच्या लिएण्डर पेस व रोहन बोपन्ना यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले, तर सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीत आगेकूच केली. जर्मनीच्या अ‍ॅण्ड्रे  बेगेमनसोबत खेळणाऱ्या पेसला फ्रान्स व इस्राइलच्या स्टीफन रॉबेर्ट आणि दुडी सेला या जोडीने पराभूत केले. रॉबेर्ट व सेला यांनी दोन तास चाललेल्या सामन्यात २-६, ७-५, ६-४ असा विजय मिळवला. ब्रायन बेकर आणि किवी मार्कस या अमेरिकन जोडीने बोपन्ना व त्याचा डेन्मार्कचा सहकारी फ्रेडेरीक निएल्सेन यांचा ६-२, ७-६(७-५) असा पराभव केला. मिश्र दुहेरीत बोपन्नाने कॅनडाच्या गॅब्रिएल डाब्रोवस्कीसह नोह रुबीन व जेमी लोएब यांच्यावर ७-५, ६-४ असा विजय मिळवला. सानिया व तिचा क्रोएशियाचा सहकारी इव्हान डॉडिग यांनी डोनाल्ड यंग व टेलर टोवसेंड या जोडीवर ६-४, ६-४ असा सोपा विजय मिळवला.