फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा
जेतेपदासाठी प्रबळ दावेदार चौकडीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा शनिवारचा दिवस गाजवला. रॉजर फेडरर, राफेल नदाल, मारिया शारापोव्हा आणि सेरेना विल्यम्स या दिग्गजांनी आपापल्या लढती जिंकत पुढच्या फेरीत आगेकूच केली. शारापोव्हाने कॅनडाच्या इग्युनी बोऊचार्डचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवत तिसरी फेरी गाठली.
यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या सेरेना विल्यम्सने सोराना सिरस्टीचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. पुरुषांमध्ये राफेल नदालला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझानने नदालविरुद्ध सलामीचा सेट जिंकत जबरदस्त सुरुवात केली. मात्र त्यानंतर नदालने आपल्या लौकिलाला साजेसा खेळ पेश करत पुढच्या तिन्ही सेटवर कब्जा करत तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले. नदालने ही लढत ४-६, ६-३, ६-३, ६-३ असा जिंकला. स्पेनच्याच डेव्हिड फेररने फेलिसिआनो लोपेझवर ६-१, ७-५, ६-४ अशी मात करत चौथ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या फेरीत भारताच्या सोमदेव देववर्मनचा धुव्वा उडवणाऱ्या फेडररने तिसऱ्या फेरीत ज्युलियन बेनटूअवर ६-३, ६-४, ७-५ अशी मात केली आणि दिमाखात चौथ्या फेरीत प्रवेश केला. सारा इराणीने सबिन लिइस्कीवर ६-०, ६-४ असा दणदणीत विजय मिळवत चौथ्या फेरीत आगेकूच केली.
सानिया-रॉबर्ट जोडीचा पराभव
सानिया मिर्झाचे मिश्र दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. कारा ब्लॅक आणि ऐसाम उल हक कुरेशी जोडीने सानिया आणि रॉबर्ट लिंडस्टेड जोडीचा ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला. या सामन्यात सानिया-रॉबर्ट जोडीचा खेळ उंचावलाच नाही. त्यामुळे दोन्ही सेट सहज गमावून त्यांना सामन्यावर पाणी सोडावे लागले. महिला दुहेरीत सानिया ही अमेरिकेच्या बेथानी मट्टेक-सँड्स हिच्या साथीने खेळणार आहे.