ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

सेरेना विल्यम्स आणि नाओमी ओसाका यांसारख्या अव्वल खेळाडूंना शुक्रवारी धक्कादायक पराभवांना सामोरे जावे लागले असले तरी शनिवारी मात्र ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नामांकित खेळाडूंनी आपली विजयी घोडदौड कायम राखली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदाल आणि विम्बल्डन विजेता सिमोना हॅलेप यांनी आपापले सामने सहज जिंकत चौथ्या फेरीत मजल मारली.

रॉजर फेडरर आणि जॉन मिलमन यांच्यात पाच सेटपर्यंत रंगलेला थरार रात्री १ वाजेपर्यंत पाहणाऱ्या राफेल नदालला सुरुवातीला थकवा जाणवत होता. मात्र स्पेनच्या पाबलो कॅरेनो बस्टाला सरळ तीन सेटमध्ये धूळ चारत आपण विजेतेपदासाठी सज्ज आहोत, हे नदालने दाखवून दिले. नदालने एक तास, ३८ मिनिटे रंगलेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात ६-१, ६-२, ६-४ असा सहज विजय मिळवला.

नदालला चौथ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिसशी लढत द्यावी लागेल. जवळपास साडेचार तास आणि पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत किर्गिसने रशियाच्या करेन खाचानोव्हचे आव्हान ६-२, ७-६ (७/५), ६-७ (६/८), ६-७ (७/९), ७-६ (१०/८) असे संपुष्टात आणले. गेल्या वर्षी नदालविषयी उपरोधिक टिपण्णी करणाऱ्या किर्गिसविरुद्धच्या सामन्याकडे आता टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने स्पेनच्या फर्नाडो वेर्डास्कोचा ६-२, ६-२, ६-४ असा पाडाव करत आगेकूच केली. त्याला पुढील फेरीत रशियाच्या ऑड्री रुबलेव्हशी झुंज द्यावी लागेल. या मोसमात आतापर्यंत अपराजित असलेल्या रुबलेव्हने बेल्जियमच्या ११व्या मानांकित डेव्हिड गॉफिनचा २-६, ७-६ (७/३), ६-४, ७-६ (७/४) असा पाडाव केला.

महिलांमध्ये रोमानियाच्या चौथ्या मानांकित सिमोना हॅलेपने कझाकस्तानच्या युलिया पुतिनत्सेवाला ६-१, ६-४ असे नामोहरम केले. तिला उपउपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमच्या एलिस मेर्टेन्सशी दोन हात करावे लागतील. मेर्टेन्सने अमेरिकेच्या कॅथरिन बेलिसला ६-१, ६-७ (५/७), ६-० असे पराभूत केले. २०१६मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणाऱ्या अँजेलिक केर्बरने इटलीच्या कॅमिला जिऑर्जीला ६-२, ६-७ (४/७), ६-३ असा घरचा रस्ता दाखवला.

दोन ग्रँडस्लॅम जेतेपदांवर नाव कोरणाऱ्या स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिनाचे आव्हान ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेंकिकला इस्टोनियाच्या जागतिक क्रमवारीत ३१व्या स्थानी असलेल्या अनेट कोन्टावेटकडून ०-६, १-६ अशी हार पत्करावी लागली. स्वितोलिना आणि बेंकिकच्या पराभवामुळे अव्वल दहा मानांकित महिला खेळाडूंपैकी सहा स्पर्धेबाहेर फेकल्या गेल्या आहेत.

बोपण्णा-नाडिया दुसऱ्या फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची युक्रेनची साथीदार नाडिया किचेनोक यांनी मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. बोपण्णा-नाडिया जोडीने युक्रेनची लॉडमायला किचेनोक आणि अमेरिकेचा ऑस्टिन क्रायसेक यांचा १ तास १५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ७-५, ४-६, १०-६ असा पराभव केला. बोपण्णा-नाडिया यांना पुढील फेरीत अमेरिकेची निकोल मेलिकर आणि ब्राझीलचा ब्रूनो सोरेस यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

जॉन आयनेरची माघार

पुरुषांच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या जॉन आयनेरने स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लॉस वॉवरिंकाविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली. २०१४च्या विजेत्या वॉवरिंकाने ६-४, ४-१ अशी आघाडी घेतली असताना आयनेरने दुखापतीमुळे माघार घेतली. फ्रान्सच्या १०व्या मानांकित गेल माँफिल्सने लॅटव्हियाच्या इर्नेस्ट गल्बिसला ७-६ (७/२), ६-४, ६-३ असे हरवले.

कोणत्याही अव्वल खेळाडू प्रत्येक वेळेला आपले सर्वोत्तम योगदान देऊ शकत नाहीत. स्पर्धेमध्ये हार-जीत असतेच. त्यामुळे अव्वल १० मधील सहा नामांकित खेळाडू बाहेर पडल्याचे आश्चर्य वाटायला नको.

– सिमोना हॅलेप

फेडररचा सामना मी रात्रभर जागून पाहत होतो. अशा प्रकारचा थरार चुकवणे अशक्य होते. पण त्याचा कोणताही परिणाम मी माझ्या खेळावर जाणवू दिला नाही. बस्टाविरुद्धचा हा माझा यंदाचा सर्वोत्तम सामना होता. दिवसेंदिवस माझ्या कामगिरीत सुधारणा होत असल्याने मी आनंदी आहे. सर्व्हिसवर तसेच फोरहँडच्या फटक्यांवर मी मेहनत घेत आहे.

– राफेल नदाल