‘राफा’ची झुंज युवा त्सित्सिपासशी ; पेट्राचा सामना अमेरिकेच्या बिगरमानांकित कॉलिन्सशी रंगणार

 

राफेल नदालने आक्रमक खेळासह एकही सेट न गमावता उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर महिलांच्या गटात घातक हल्ल्यानंतर पुनरागमन केलेल्या पेट्रा क्विटोव्हानेदेखील दमदार खेळाचे प्रदर्शन घडवीत उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या नवव्या दिवशी द्वितीय मानांकित राफेल नदालने अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोवर ६-३,६-४,६-२ अशी सलग तीन सेटमध्ये सहज मात केली. नदालने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट न गमावता वाटचाल केली आहे. टियाफोने केव्हिन अ‍ॅँडरसनला नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा असताना टियाफोचा नदालपुढे टिकाव लागला नाही. दुसरीकडे ग्रीकचा युवा स्टीफॅनोस त्सित्सिपास याने स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा अग्युट याच्यावर ७-५,४-६,६-४, ७-६ अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत नदालचा सामना त्सित्सिपासशी होणार आहे. फेडररला पराभूत केल्यापासून परीकथेतील गोष्टीतच जगत असल्यासारखे मला वाटत असल्याचे त्सित्सिपास याने सांगितले. त्यामुळे मी थोडासा भावुक झालो असून मी या यशासाठी प्रचंड कष्ट घेतले असल्याचे त्सित्सिपासने नमूद केले.

महिलांच्या गटात झेक रिपब्लिकच्या क्विटोव्हाने २०१६ साली तिच्यावर सुरीने झालेल्या हल्ल्याच्या घटनेतून सावरत जोरदार पुनरागमन केले आहे. त्या हल्ल्यात क्विटोव्हाच्या डाव्या हाताच्या नसेला गंभीर दुखापत झाल्याने सहा महिन्यांहून अधिक काळ खेळापासून दूर राहावे लागले होते. मात्र क्विटोव्हाने या सामन्यात अ‍ॅश्ले बार्टीला सहजपणे नमवीत आपणदेखील दावेदार असल्याचे दाखवून दिले.

क्विटोव्हाने बार्टीला ६-१, ६-४ असे पराभूत केले. दोन वेळच्या विम्बल्डन विजेत्या क्विटोव्हाने तिच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. माझ्या कारकीर्दीचा हा दुसरा टप्पा असून त्या घटनेनंतर मी प्रथमच कोणत्याही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकल्याचा आनंद असल्याचे तिने नमूद केले. आता क्विटोव्हाला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित कॉलिन्सशी झुंजावे लागणार आहे. त्या सामन्यात विजय मिळवून कोणत्याही परिस्थितीत अंतिम फेरीत पोहोचायचे हे मी ठरवले असल्याचे क्विटोव्हाने नमूद केले. कॉलिन्सने उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या अ‍ॅनास्तासिया  पावलुचेन्कोव्हाला २-६, ७-५, ६-१ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली आहे.