स्पेनच्या राफेल नदालने डेव्हिड फेररचे कडवे आव्हान परतवून लावत माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. अँडी मरेला मात्र टॉमस बर्डिचकडून ७-६ (७/३), ६-४ असे पराभूत व्हावे लागले. महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने अंतिम फेरीत मजल मारली आहे. मरे, फेरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर या अव्वल चार खेळाडूंचे आव्हन संपुष्टात आल्यामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणारा नदाल जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. नदालने चौथ्या क्रमांकावरील फेररला ४-६, ७-६ (७/३), ६-० असे हरवले. सेरेनाने सातव्या मानांकित सारा इराणीला ७-५, ६-२ असे पराभूत केले. तिला अंतिम फेरीत मारिया शारापोव्हा आणि अ‍ॅना इव्हानोव्हिच यांच्यातील विजेतीशी लढत द्यावी लागेल. शारापोव्हाने उपांत्य फेरीत काया कनेपी हिचे आव्हान ६-२, ६-४ असे सहजपणे संपुष्टात आणले.
भूपती-बोपण्णाचे आव्हान संपुष्टात
माद्रिद : भारताच्या महेश भूपती आणि रोहन बोपण्णा जोडीला फ्रान्सचा जेरेमी चार्डी आणि पोलंडचा लुकास कुबोट या बिगरमानांकित जोडीकडून पराभूत व्हावे लागल्याने माद्रिद मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या सेटमध्ये सहा ब्रेक पॉइंट आपल्याकडे वळवण्यात अपयश आल्यामुळे भूपती-बोपण्णा जोडीने उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना २-६, ४-६ असा गमावला. याआधी लिएण्डर पेस आणि त्याचा ऑस्ट्रियाचा सहकारी जर्गन मेल्झर यांना दुसऱ्या फेरीतच पराभूत व्हावे लागले होते. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि बेथानी मटेक सँड्स यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले होते.