ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत बलाढय़ खेळाडूंनी पराभवाचे धक्के पचवणे, हे आता नित्यनेमाचे झाले आहे. बुधवारचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. स्पेनच्या राफेल नदालने पराभव टाळला तरी अँडी मरे आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांच्या रूपाने आणखी दोन मोहरे जेतेपदाच्या शर्यतीतून बुधवारी गळाले. नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा या जेतेपदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या खेळाडूंना गाशा गुंडाळावा लागल्यानंतर जेतेपदासाठीची शर्यत खुली झाली आहे. नदाल आणि रॉजर फेडरर या अनुभवी खेळाडूंनी विजयी घोडदौड कायम राखत जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. आता या दोन अनुभवी खेळाडूंमध्येच उपांत्य फेरीचा मुकाबला रंगणार आहे. महिलांमध्ये स्लोव्हाकियाची डॉमिनिका सिबुलकोव्हा आणि पोलंडची अग्निस्झेका रॅडवान्स्का यांनी उपांत्य फेरीत मजल मारली.
गेल्या मोसमात एकही ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावता न आल्यामुळे फेडरर संपला, अशी चर्चा होती. मात्र १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे आपल्या नावावर करणाऱ्या स्वित्र्झलडच्या फेडररने ब्रिटनच्या अँडी मरेला बाहेरचा रस्ता दाखवत उपांत्य फेरीत धडक मारली. पहिल्या दोन सेटमध्ये जबरदस्त खेळ करत फेडररने सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र त्याला मरेच्या कडव्या संघर्षांचा सामना करावा लागला. तिसरा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतर मरेने अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावत सामन्यात चुरस निर्माण केली. चौथ्या सेटला सुरुवात होण्याआधी फेडररने १९ मिनिटे विश्रांती घेतली. ताजातवाना झाल्यानंतर फेडररने सुसाट खेळ करत हा सामना ६-३, ६-४, ६-७ (६/८), ६-३ असा जिंकत आपण संपलो नसल्याचे दाखवून दिले.
१३ वेळा ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या नदालने पहिला सेट सहज गमावला. तिसऱ्या सेटमध्ये सेट पॉइंट वाचवणाऱ्या नदालने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. चौथ्या सेटमध्ये बल्गेरियाच्या ग्रेगोर दिमित्रोव्हचा धुव्वा उडवत नदालने उपांत्यपूर्व फेरीत ३-६, ७-६ (७/३), ७-६ (९/७), ६-२ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ग्रँड स्लॅम स्पर्धेतील २२व्या उपांत्य फेरीत नदालला आता रॉजर फेडररच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना टॉमस बर्डिच आणि जोकोव्हिचला हरवणाऱ्या वावरिंकाशी होणार आहे. ‘‘आजचा दिवस माझा होता. तिसऱ्या सेटमध्ये मी सेट पॉइंट वाचवू शकलो, हे माझे नशीब आहे. त्यावेळी दिमित्रोव्हला सोपा फोरहँड लगावता आला नाही,’’ असे नदालने सांगितले.
महिलांमध्ये बेलारूसच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काची रॉड लेव्हर एरिनावरील गेल्या दोन वर्षांपासूनची घोडदौड अखेर अग्निस्झेका रॅडवान्स्काने संपुष्टात आणली. रॅडवान्स्काने हा सामना ६-१, ५-७, ६-० असा जिंकला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाने रोमानियाच्या सिमोना हलेप हिचा ६-३, ६-० असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळणाऱ्या चिबुलकोव्हाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. अझारेन्काच्या पराभवामुळे आता ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या महिला गटात नवा विजेता मिळणार आहे. रॅडवान्स्का, लि ना, डॉमिनिका सिबुलकोव्हा आणि युगेनी बौचार्ड यांच्यापैकी कुणालाही ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे जेतेपद मिळवता आलेले नाही.

पेस-स्टेपानेकला पराभवाचा धक्का
मेलबर्न : भारताचा वरिष्ठ टेनिसपटू लिएण्डर पेस आणि त्याचा झेक प्रजासत्ताकचा साथीदार राडेक स्टेपानेक यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पाचव्या मानांकित पेस-स्टेपानेक जोडीवर १३व्या मानांकित फ्रान्सच्या मायकेल लॉड्रा-निकोलस माहूत जोडीने २-६, ६-७ (४) अशी मात केली. दीड तासांपेक्षा कमी वेळ रंगलेल्या या एकतर्फी सामन्यात लॉड्रा-माहूत जोडीने पहिल्या सव्‍‌र्हिसच्या बळावर बाजी मारली. पेस आणि स्टेपानेकची दोन वेळा सव्‍‌र्हिस भेदत फ्रान्सच्या जोडीने २९ मिनिटांत पहिला सेट आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये पेस-स्टेपानेक यांनी कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण लॉड्रा-माहूत जोडीने टायब्रेकरमध्ये सरस खेळ करत उपांत्य फेरीत मजल मारली. पेसच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.