लाल मातीचा बादशाह असणारा राफेल नदाल ग्रासकोर्टवर मात्र दडपणाखाली असतो, अशी प्रतिक्रिया माजी टेनिसपटू बोरिस बेकर यांनी व्यक्त केली. यापुढे ग्रासकोर्टवर खेळायचे की नाही याचा त्याने गांभीर्याने विचार करायला हवा, असे बेकरने म्हटले आहे. माझ्या मते या वर्षी त्याने ग्रासकोर्टवर खेळण्याबाबत पुनर्विचार करायला हवा होता, असे बेकर यांनी पुढे म्हटले आहे. नदाल गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून परतला आहे. ग्रासकोर्टवर अधिक वेळा चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी वाकावे लागते. फटके खेळताना प्रचंड हालचाल करावी लागत असल्याने गुडघ्यावर ताण पडतो. फ्रेंच खुल्या स्पर्धेत अर्थात क्ले कोर्टवरची परिस्थितीमुळे त्याच्या गुडघ्यावर ताण पडत नाही परंतु १५ दिवसांत क्ले कोर्टवरून ग्रासकोर्टशी जुळवून घेणे नदालला कठीण गेल्याचे बेकर यांनी सांगितले. विम्बल्डनच्या ग्रासकोर्टशी जुळवून घेण्यासाठी सराव स्पर्धा आयोजित केल्या जातात, मात्र नदाल या स्पर्धामध्ये सहभागी झाला नव्हता. ग्रासकोर्टवर खेळण्याच्या सरावाविना विम्बल्डनसारख्या मोठय़ा स्पर्धेत सहभागी होणे नदालला महागात पडल्याचे परखड मत बेकर यांनी व्यक्त केले.