अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

गतविजेता राफेल नदाल याने करोना संसर्गाच्या धोक्यामुळे अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. नदालने मंगळवारी रात्री ‘ट्वीट’ करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘‘जगभरातील परिस्थिती अधिकच किचकट आणि गुंतागुंतीची बनत चालली आहे. करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण अद्यापही करोनासारख्या विषाणूवर नियंत्रण मिळवू शकलो नाही, हे त्यातून सिद्ध होते. अमेरिकन स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेण्याची माझी इच्छा नव्हती. पण सद्यस्थितीत प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अखेर माघार घ्यावी लागत आहे,’’ असे नदालने म्हटले आहे. स्पर्धेच्या संचालिका स्टॅसी अ‍ॅलस्टर यांनी नदालच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नागलला थेट प्रवेश

न्यूयॉर्क  : प्रमुख खेळाडूंनी करोनामुळे माघार घेतल्याने भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल याला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्यासाठी नागल सज्ज झाला आहे. जागतिक क्रमवारीत १२७व्या स्थानी असलेला नागल हा मुख्य फेरीसाठी प्रवेश मिळालेला अखेरचा टेनिसपटू ठरला आहे.