News Flash

नदालची माघार; चिलीच उपांत्य फेरीत

मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला सहाव्या मानांकित चिलिचविरुद्धच्या रोमहर्षक लढतीमधून माघार घ्यावी लागली.

| January 24, 2018 02:27 am

एडमंडकडून दिमित्रोव पराभूत

अजिंक्यपदावर पुन्हा मोहोर नोंदविण्यासाठी उत्सुक असलेल्या राफेल नदालने मरीन चिलिचविरुद्ध पाचव्या सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे चिलिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीतील अन्य लढतीत काईल एडमंडने तृतीय मानांकित ग्रिगोर दिमित्रोववर सनसनाटी विजय नोंदविला.

या वेळी माजी विजेत्या नदालच्या कामगिरीबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला सहाव्या मानांकित चिलिचविरुद्धच्या रोमहर्षक लढतीमधून माघार घ्यावी लागली. त्या वेळी चिलिचकडे ३-६, ६-३, ६-७ (५-७), ६-२, २-० अशी आघाडी होती. बिगरमानांकित एडमंडने दिमित्रोववर ६-४, ३-६, ६-३, ६-४ अशी मात केली. खुल्या स्पर्धा सुरू झाल्यापासून या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा तो चौथा ब्रिटिश खेळाडू आहे. उपांत्य फेरीत चिलिचची एडमंडशी गाठ पडणार आहे. या दोन खेळाडूंमध्ये यापूर्वी फक्त एकच सामना झाला आहे. शांघाय मास्टर्स स्पर्धेत चिलिचने एडमंडला पराभूत केले होते.

एडमंडने दिमित्रोवविरुद्धचा सामना दोन तास ४९ मिनिटांमध्ये जिंकला. त्याने परतीच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग केला तसेच त्याने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. एडमंडने पहिल्या फेरीत अमेरिकन उपविजेत्या केविन अँडरसनला पराभूत केले होते. त्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या एडमंडने सातत्यपूर्ण कामगिरी करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. दिमित्रोवविरुद्ध त्याने पाच वेळा सव्‍‌र्हिसब्रेक नोंदवला.

चिलिचला पहिल्या सेटमध्ये सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. या सेटमध्ये नदालने कॉर्नरजवळ परतीचे खणखणीत फटके मारले. दुसऱ्या सेटमध्ये चिलिचला सूर सापडला. त्याने फोरहँडच्या फटक्यांचा उपयोग करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हा सेट घेत त्याने अपेक्षा निर्माण केल्या. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या सव्‍‌र्हिस तोडल्या. हा सेट टायब्रेकरद्वारा नदालने घेतला. त्याने नेटजवळून क्रॉसकोर्टचे सुरेख फटके मारले. चौथ्या सेटपासून नदालला पायातील स्नायूंच्या वेदना जाणवू लागल्या. या सेटमध्ये त्याची सव्‍‌र्हिस तोडण्यात चिलिचला यश मिळाले. हा सेट घेत चिलिचने सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. पाचव्या सेटमध्ये चिलिचने सव्‍‌र्हिस राखली. पुढच्या गेमच्या वेळी नदाल याला असहय़ वेदना सुरू झाल्या. त्याने वैद्यकीय तज्ज्ञाची मदत घेतली. पण पाऊल टाकणेही अवघड आहे असे लक्षात आल्यानंतर त्याने माघार घेतली.

मर्टन्सचा स्वितोलिनावर सनसनाटी विजय

  • वोझ्नियाकीही उपांत्य फेरीत

बेल्जियमच्या एलिस मर्टन्सने स्वप्नवत कामगिरी सुरू ठेवत चौथी मानांकित एलिना स्वितोलिनावर सनसनाटी विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत उपांत्य फेरी गाठली. तिला उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित कॅरोलीन वोझ्नियाकीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

बिगरमानांकित मर्टन्सने स्वितोलिनाचा ६-४, ६-० असा सहज पराभव केला. तिने प्रथमच या स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत स्थान मिळविले आहे. किम क्लायस्टर्सच्या अकादमीत ती प्रशिक्षण घेत आहे. तिचा प्रेमी रॉबी सेयेन्स हाच तिचा प्रशिक्षक आहे. उपांत्यपूर्व फेरीत वोझ्नियाकीने स्पेनच्या कार्ला सुरेझ नॅव्हेरोची घोडदौड ६-०, ६-७ (३-७), ६-२ अशी रोखली.

मिश्र दुहेरीत बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत

भारताचे एकमेव आशास्थान उरलेल्या रोहन बोपण्णाने हंगेरीच्या तिमिआ बाबोस हिच्या साथीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्रदुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

बोपण्णा व बाबोस यांनी व्हॅनिया किंग (अमेरिका) व फ्रॅन्को स्कुगोर (क्रोएशिया) यांचा ६-४, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. दोन्ही सेट्समध्ये बोपण्णा व बाबोस यांनी परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला तसेच त्यांनी व्हॉलीजचाही कल्पकतेने खेळ केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 2:27 am

Web Title: nadal withdrew from australian open 2018
Next Stories
1 कारण प्रत्येकजण धोनी नसतो; पाकिस्तानी कर्णधार सरफराज झाला ट्रोल
2 IPL 2018 – अकराव्या हंगामाची तारीख ठरली, सामन्यांच्या वेळातही बदल
3 हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाची नवीन कर्णधार, आफ्रिकेविरुद्ध टी-२० संघाचं नेतृत्व
Just Now!
X