‘‘सर्वसाधारण मुलांप्रमाणेच माझ्या कारकीर्दीला सुरुवात झाली. अपवादात्मक असे कोणतेही कौशल्य माझ्याकडे नाही. लहानपणी मीसुद्धा विम्बल्डन, फ्रेंच स्पर्धा पाहात असे. या ठिकाणी खेळायला मिळावे, अशी माझी इच्छा होती. जर मी या स्पर्धाची जेतेपदे पटकावू शकतो, तर कोणीही ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकतो. प्रगतीला पोषक अशा व्यक्तींची साथ मिळाली तर वाटचाल सोपी होते,’’ असे मत ‘लाल मातीचा राजा’ आणि १४ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या राफेल नदालने व्यक्त केले.
राफेल नदाल अकादमी आणि महेश भूपती अकादमी हे संयुक्तपणे प्रतिभाशोध उपक्रम राबवणार आहेत. या निमित्ताने आर. के. खन्ना स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात नदाल म्हणाला, ‘‘दोन अकादम्यांकडून भारतातील गुणी युवा टेनिसपटूंचा शोध घेण्यात येईल. मोजक्या अव्वल खेळाडूंना नदालचे जन्मगाव असलेल्या स्पेनमधील मॅनकोर येथे प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अकादमीत शाळा असणार आहे. याव्यतिरिक्त व्यायामशाळा, जलतरण तलाव, वैद्यकीय केंद्र अशा सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध होतील. अधिकाअधिक भारतीय खेळाडूंनी या सुविधेचा लाभ उठवावा.’’
‘‘मेहनतीला कोणताही पर्याय नाही. सातत्याने खेळात सुधारणा केली. सुदैवाने काकाच प्रशिक्षक असल्याने (टोनी नदाल) घरातलं कोणी तरी सदैव माझ्याबरोबर आहे. पराभवाच्या वेळी, गोष्टी मनाप्रमाणे घडत नसताना त्यांचा अनुभव उपयोगी पडतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड स्पर्धा आहे. सतत नवनवे डावपेच आखावे लागतात. खेळाची आवड असल्याने हे श्रम जाणवतच नाहीत,’’ असे नदालने सांगितले.
दुखापतींनी सातत्याने सतावल्याने नदालला यंदाच्या वर्षांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याविषयी विचारले असता नदाल म्हणाला, ‘‘दुखापती क्रीडापटूंच्या आयुष्याचा भाग आहेत. मी त्यांना टक्कर देत खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र शरीरावर आपल्या इच्छा लादण्यात काही अर्थ नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणे अवघड आहे. ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची क्षमता नक्कीच आहे.’’
‘‘रॉजर फेडररविरुद्धचे द्वंद्व नेहमीच आव्हानात्मक असते. या मुकाबल्याच्या निमित्ताने चाहत्यांना अव्वल दर्जाच्या टेनिसची पर्वणी मिळते, हे समाधानकारक आहे. आयपीएलमध्येही फेडररविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे,’’ असे नदालने स्पष्ट केले.