आतापर्यंत क्रिकेटच्या सामन्यांमध्ये तुम्ही धावांचे इमले रचले जात असताना पाहिले असतील. तर दुसरीकडे मातब्बर संघ अवघ्या शंभर धावांच्या आत बाद होतानाही आपण पाहिले असेल. मात्र, केरळ येथे सुरु असलेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात केरळच्या संघाने नागालँडच्या संघाचा अवघ्या २ धावांवर धुव्वा उडवला. केरळच्या गुंटुंर येथील जेकेसी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सामना खेळवला गेला होता. नागालँडच्या संघाचं हे आव्हान केरळच्या महिलांनी अवघा एक चेंडू खेळून काढत पूर्ण केलं. या विजयासह केरळच्या महिला संघाने नवा विक्रम प्रस्थातिप केला आहे. यापूर्वी नेपाळच्या संघाच्या नावावर अवघ्या दोन चेंडुंमध्ये सामना जिंकण्याचा विक्रम होता. २००६ साली नेपाळच्या संघाने म्यानमारच्या संघाचं आव्हान अवघ्या २ चेंडुंमध्ये पूर्ण केलं होतं.

या सामन्यात नागालँडच्या महिला संघाने तब्बल १७ षटकं खेळली, मात्र सलामीची फलंदाज मेनकाने काढलेली एक धाव आणि एक अवांतर धाव अशा केवळ २ धावा नागालँडच्या संघाला काढता आल्या. उर्वरित संघाने केवळ मैदानावर हजेरी लावत माघारी परतण्यात धन्यता मानली. मेनकाचा अपवाद वगळता एकही खेळाडू आपलं धावांचं खातं उघडू शकला नाही. केरळकडून कर्णधार मिनूमणीने ४ पैकी ४ षटकं निर्धाव टाकत ४ बळी मिळवले. नागालँडचं हे आव्हान केरळने अगदी लिलया पार केलं. नागालँडची गोलंदाज दिपीका कैंतुराने पहिलाच चेंडू वाईड टाकत केरळच्या महिलांना एक धाव बहाल केली. यानंतर केरळची सलामीची फलंदाज अंशु राजूने चौकार लगावत आपल्या संघाचा विजय निश्चीत केला.

अवश्य वाचा – ‘मम्मी’ क्रिकेटच्या मैदानात, महिला शक्तीचा आणखी एक साक्षात्कार

केरळ आणि नागालँड या संघांनी मुलींच्या १९ वर्षांखालील सुपर लीग स्पर्धेचे पहिले ३ सामने गमावले आहेत. मात्र ‘ब’ गटात केरळने नागालँडवर मिळवलेला विजय हा त्यांचा पहिला विजय ठरला आहे. या स्पर्धेत अन्य सामन्यांमध्येही फलंदाजांकडून हाराकिरी झालेली पहायला मिळाली. बिहारच्या महिला संघाला बंगालच्या संघाने अवघ्या २१ धावांमध्ये बाद करत, ९ गडी राखून सामन्यात विजय मिळवला.

अवश्य वाचा – येथे मुलींना वजनाची नसे फिकीर!