शशांक मनोहर यांचे स्पष्टीकरण
नागपूर खेळपट्टीसंदर्भातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. परंतु या खेळपट्टीबाबत सामनाधिकारी जेफ क्रो यांनी घेतलेला निर्णय सापेक्ष आणि वस्तुनिष्ठ असल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी व्यक्त केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गांधी-मंडेला कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी नागपूर येथे झाली होती. गोलंदाजांना साहाय्यक खेळपट्टीवर अडीच दिवसांत कसोटी निकाली ठरली होती. मालिकेनंतर नागपूरची खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल सामनाधिकारी क्रो यांनी आयसीसीला सादर केला. या अहवालामुळे आयसीसीने नागपूर संयोजकांना ताकीद दिली होती.
‘‘आयसीसीच्या नियमावलीनुसार खेळपट्टय़ांचे उत्कृष्ट, ठीक, खराब आणि धोकादायक असे वर्गीकरण होते. फिरकी किंवा वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्टय़ांचे खराब गटात वर्गीकरण होते. क्रो यांच्या अहवालानुसार आयसीसीने निर्णय घेतला आहे. त्याचा आम्ही स्वीकार करतो,’’ असे मनोहर यांनी स्पष्ट केले.
‘‘बीसीसीआय अध्यक्ष (नागपूर) आणि ंसचिव (धरमशाला) हे यजमान असलेल्या केंद्राना विश्वचषक आयोजनात झुकते माप मिळाल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. विश्वचषकासाठी आठ मैदानांचा प्रस्ताव बीसीसीआयने सादर केला होता. मात्र आयसीसीच्या आर्थिक मर्यादांमुळे पाच ठिकाणीच सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला,’’ असे मनोहर यांनी सांगितले.