भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नागपूर येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी वाईट दर्जाची असल्याचे आयसीसीकडून ( आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती) मंगळवारी जाहीर करण्यात आले. ‘आयसीसी’ला सादर केलेल्या अहवालात सामनाधिकारी जेफ क्रो यांनी खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे. जेफ क्रो यांच्या या अहवालामुळे भारताच्या मालिका विजयाला  गालबोट लागले आहे. भारताने या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर १२४ धावांनी विजय मिळवला होता. नागपूर कसोटी सुरू झाल्यापासूनच जामठाच्या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या फलंदाजांना टिकाव धरणे अवघड जात होते. त्यामुळे खेळपट्टीच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती.  दरम्यान, आयसीसीने हा अहवाल बीसीसीआयला ( भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) पाठवला असून पुढील १४ दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.