पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारताविरुद्धच्या क्रिकेट मालिका वादात पाकिस्तानलाच दंड ठोठावल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) बसणाऱ्या आर्थिक नुकसानीसाठी माझे उत्तराधिकारी नजम सेठीच जबाबदार असल्याचा आरोप पीसीबीचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांनी केला आहे.

भारताने क्रिकेट मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास विरोध दर्शवल्याने पीसीबीला मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागले आहे, याची नुकसानभरपाई भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने द्यावी, ही पीसीबीची मागणी आयसीसीने फेटाळून लावली. उलट आयसीसीने पीसीबीलाच १२ लाख डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. त्या पार्श्वभूमीवर पीसीबीतील आजी-माजी अध्यक्षांमधील वाद उफाळून आला आहे.

‘‘बीसीसीआयशी चर्चा करून मालिका खेळवण्याच्या वादावर तोडगा काढावा, या विचारावर मी नेहमीच ठाम होतो. मात्र सेठींनी भारताविरुद्ध दावा दाखल करण्याच्या प्रकरणात पुढाकार घेत आयसीसीकडे धाव घेतली होती. त्यामुळे जो काही आर्थिक फटका आम्हाला सहन करावा लागणार आहे, त्याला संपूर्णपणे सेठीच जबाबदार आहेत,’’ असे शहरयार खान यांनी म्हटले आहे.

आयसीसीने पीसीबीचा दावा अमान्य करीत त्यांनाच दंड ठोठावल्यावर सेठी यांनी हे प्रकरण अंगाशी येऊ नये, यासाठी त्यातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला. पीसीबीच्या संचालन समितीनेच या दाव्याला परवानगी दिली, असे सेठी यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. त्यानंतर शहरयार खान यांनी सेठींनीच या दाव्यासाठी कसा पाठपुरावा केला, त्याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.

‘‘आपली बाजू मांडताना कोणतेही ठोस पुरावे नसल्याने निकाल बीसीसीआयच्याच बाजूने लागू शकतो, याची कल्पना मी सेठी यांना दिली होती. पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मी अध्यक्ष असताना २०१७ साली बीसीसीआयला याप्रकरणी नोटीस बजावून चर्चा करण्याचे आवाहन केले होते. मी तत्कालीन आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक स्तरावर बोललो होतो. ते हा वाद दूर करण्यास राजी असल्याचे जाणवत होते. मात्र सेठींच्या कार्यकाळात हा संपूर्ण वाद वकिलांच्या माध्यमातून हाताळला गेल्याने प्रकरण हाताबाहेर गेले,’’ असेही खान यांनी म्हटले आहे.