भारताचा नेमबाजपटू प्रकाश नंजप्पाला रिओ येथे २०१६ मध्ये पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. ३९ वर्षीय नंजप्पाने ५० मीटर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत ५६७ गुण नोंदविले. त्याची ही कामगिरी ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण करणारी ठरली.
अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ५० मीटर पिस्तूल प्रकारात त्याने आठवे स्थान मिळविले. ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण करणारा तो भारताचा सहावा नेमबाज आहे. भारताच्या जितू राय, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, कांस्यपदक विजेता गगन नारंग, अपूर्वी चंडेला व गुरप्रीतसिंग यांनी यापूर्वीच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे.
नंजप्पाने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक मिळविले होते. मात्र त्याच वर्षी ग्रेनाडा येथील जागतिक स्पर्धेत त्याला अर्धागवायूचा आजार झाला. त्याच्या चेहऱ्याचा एक भाग बधिर झाला. मात्र त्यावर उपचार घेतल्यानंतर व पुरेशा विश्रांतीनंतर तो पुन्हा नेमबाजीचा सराव करू लागला. त्याने आशियाई एअर गन स्पर्धेत ५० मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक मिळविले. गतवर्षी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक व आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.