08 March 2021

News Flash

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : ओसाकाला पराभवाचा धक्का

राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीत; जोकोव्हिचची माघार

राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीत; जोकोव्हिचची माघार

न्यूयॉर्क : गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने खांद्याच्या दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली असली तरी महिलांमध्ये गतविजेती नाओमी ओसाका हिला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पुरुषांमध्ये स्पेनचा राफेल नदाल आणि गेल माँफिल्स यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेंकिक हिने १ तास २७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात जपानच्या अग्रमानांकित ओसाकाचे आव्हान ७-५, ६-४ असे सहजपणे परतवून लावले. बेंकिकचा या वर्षांतील ओसाकावरील हा तिसरा विजय ठरला. या पराभवामुळे ओसाकाला आपले अग्रस्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे. बेंकिक हिला उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या २३व्या मानांकित डॉना वेकिक हिच्याशी लढत द्यावी लागेल. डॉनाने जर्मनीच्या जुलिया जॉर्जेस हिच्याविरुद्ध ६-७ (५/७), ७-५, ६-३ असा विजय संपादन केला. बेल्जियमच्या २५व्या मानांकित एलिस मेर्टेन्स हिने अमेरिकेच्या क्रिस्ती आहन हिचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.

पुरुषांमध्ये, दुसऱ्या मानांकित राफेल नदालने २०१४च्या विजेत्या मारिन चिलिच याचा ६-३, ३-६, ६-१, ६-२ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. त्याला पुढील फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमन याच्याशी झुंज द्यावी लागेल. २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या नदालला जोकोव्हिचच्या माघारीमुळे आता पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.

श्वार्ट्झमन याने जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झेरेव्हचे आव्हान ३-६, ६-२, ६-४, ६-३ असे संपुष्टात आणले. फ्रान्सच्या १३व्या मानांकित गेल माँफिल्सने स्पेनच्या पाबलो आंदूजार याला ६-१, ६-२, ६-२ असे सहजपणे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. इटलीच्या मॅट्टेओ बारेट्टिनी याने रशियाच्या आंद्रेय रुबलेव्ह याचा ६-१, ६-४, ७-६ (८/६) असा पाडाव करत आगेकूच केली.

बेंकिकने खूपच छान खेळ केला. या सामन्यासाठी आखलेल्या रणनीतीची तिने यशस्वीपणे अंमलबजावणी केली. पराभवाने निराश झाले नसले तरी यापुढे मी जोमाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याचा प्रत्यय पाहायला मिळेल.

      – नाओमी ओसाका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 3:36 am

Web Title: naomi osaka is ousted from the us open tennis championship zws 70
Next Stories
1 रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडची श्रीलंकेवर चार गडी राखून मात
2 भारत ‘अ’-आफ्रिका ‘अ’ क्रिकेट मालिका : शिखर धवनचे पुनरागमनाचे ध्येय!
3 England vs. Australia : स्मिथच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाची बाजू बळकट
Just Now!
X