चॅम्पियन्स लीगच्या सलामीच्याच सामन्यात नापोलीची गतविजेत्यांवर २-० अशी मात

पॅरिस : विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या लिव्हरपूल संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात नापोलीने लिव्हरपूलला २-० असे पराभूत केले.

सॅन पावलो स्टेडियमवर झालेल्या ‘ई’ गटातील या लढतीत मोहम्मद सलाह, सॅडिओ मेन, झेदरान शकिरी यांसारखे प्रतिभावान खेळाडू असूनही लिव्हरपूलला गोल साधता आला नाही. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

मध्यंतरानंतर मात्र नापोलीने आक्रमणावर भर दिला. ८१व्या मिनिटाला जोस कॉलेजनला लिव्हरपूलच्या अँडी रॉबर्टसनचा धक्का लागून तो पेनल्टी क्षेत्रात पडल्यामुळे नापोलीला पेनल्टी बहाल करण्यात आली. याचा फायदा उचलून ड्रिस मर्टन्सने ८२व्या मिनिटाला नापोलीसाठी पहिला गोल नोंदवला. उर्वरित वेळेत बरोबरी साधण्यासाठी लिव्हरपूलच्या खेळाडूंनी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु भरपाई वेळेत फर्नाडो लॉरेंटने (९०+२) दुसरा गोल करून नापोलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले व सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.

१७ तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच लिव्हरपूलला चॅम्पियन्स लीगचा सलामीचा सामना गमवावा लागला. यापूर्वी २००२ मध्ये व्हॅलेन्सियाने त्यांना २-० असे नमवले होते.

घरच्या मैदानावर गेल्या सहा लढतींतील नापोलीचा हा पाचवा विजय ठरला. २०१७मध्ये मँचेस्टर सिटीविरुद्ध त्यांनी ४-२ असा पराभव पत्करला होता.