04 March 2021

News Flash

विश्वचषकासाठी नरसिंह आणि राहुल सज्ज

चार वर्षांच्या उत्तेजक बंदीनंतर नरसिंहला पुनरागमन करण्याची संधी विश्वचषकातून मिळाली आहे

(संग्रहित छायाचित्र)

सुप्रिया दाबके

सर्बियातील बेलग्रेड येथे १२ डिसेंबरपासून होणाऱ्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुस्तीपटू नरसिंह यादव आणि राहुल आवारे सज्ज आहेत. या स्थितीत या विश्वचषकातून दोन पदकांची अपेक्षा महाराष्ट्राला आहे.

चार वर्षांच्या उत्तेजक बंदीनंतर नरसिंहला पुनरागमन करण्याची संधी विश्वचषकातून मिळाली आहे. ‘‘बंदीचा काळ माझ्यासाठी अवघड असला तरी एक कुस्तीपटू म्हणून मी स्वत: शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ाही कणखर ठेवले. या काळात तंदुरुस्तीवर भरपूर मेहनत घेतली. स्पर्धात्मक कुस्ती खेळण्याची संधी मिळाली नसली तरी कुस्ती आखाडय़ात जितका व्यायाम करणे शक्य होते तितका केला. भारतीय संघात पुन्हा यशस्वी पुनरागमन करण्याची जिद्द होती. त्याप्रमाणे विश्वचषकासाठी स्थान मिळवता आल्याचे समाधान मोठे आहे. आता विश्वचषकात देशाला पदक जिंकून देणार ,’’ असे ७४ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नरसिंहने म्हटले.

टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी ७४ किलो वजनी गटात नरसिंहसमोर सुशील कुमार, जितेंदर किन्हा यासारख्या कुस्तीपटूंचे आव्हान आहे. ‘‘विश्वचषकानंतर टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याच्या दृष्टीने मेहनत घ्यायला सुरुवात करणार आहे. टोक्यो ऑलिम्पिक करोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याने पात्र ठरण्याच्या दृष्टीने संधी मला मिळणार आहे. माझ्या वजनी गटात मला चुरस आहे. मात्र तरीदेखील कुस्तीमधून ऑलिम्पिकमध्ये देशाला आणि महाराष्ट्राला मला पदक मिळवून द्यायचे आहे,’’ असे नरसिंहने म्हटले.

विश्वचषकाच्या तयारीबाबत राहुल आवारे म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत विश्वचषकापेक्षा निश्चित मोठी चुरस असते. या स्थितीत विश्वचषकातून राज्याला पदक जिंकून देईन याची खात्री आहे. करोनाच्या टाळेबंदीमुळे कुस्तीपासून दूर राहावे लागले असले तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत योगा, व्यायाम यावर भरपूर मेहनत घेतली. विश्वचषकासारख्या स्पर्धेत आता थेट सहभागी व्हायला मिळत असल्याने एक खेळाडू म्हणून जास्त आनंद झाला आहे. अन्य स्पर्धाप्रमाणे या स्पर्धेची तयारी करता आली नसली तरी चांगली कामगिरी अपेक्षित आहे.’’

ऑलिम्पिकसाठी वजनी गटात बदल

राहुल टोक्यो ऑलिम्पिकला पात्रतेची संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे. ‘‘भारतीय कुस्ती महासंघाकडे पात्रता स्पर्धा आयोजित करण्याची मागणी सातत्याने करत आहोत. जर पात्रता स्पर्धेचे महासंघाकडून आयोजन झाले तर मी चांगली कामगिरी करून दाखवेन आणि ऑलिम्पिकसाठी निवड होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी मिळेल. ६१ किलो हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये नसल्याने ५७ किलो प्रकारात मला सहभागी व्हावे लागेल. मात्र त्यासाठी वजन कमी करून ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,’’ असे राहुलने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:17 am

Web Title: narasimha and rahul ready for world cup abn 97
Next Stories
1 एका मूत्रपिंडाद्वारे यश मिळवले -अंजू
2 करोनाचा फटका : दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातली वन-डे मालिका पुढे ढकलली
3 अनुष्काकडून ‘टीम इंडिया’चं कौतुक; विराटसाठी वापरला ‘हा’ खास शब्द
Just Now!
X