नवी दिल्ली : भारताचे माजी फिरकीपटू तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक नरेंद्र हिरवाणी आता भारतीय महिला संघासोबत फिरकी गोलंदाजीचे सल्लागार म्हणून काम करणार आहेत.

भारताकडून १७ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळणारे हिरवाणी हे निवडक दौऱ्यांवर भारतीय महिला संघासोबत जातील. एकता बिश्त, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा या फिरकीपटूंसाठी फिरकी गोलंदाजीच्या प्रशिक्षकाची गरज आहे, अशी इच्छा भारताच्या ट्वेन्टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केली होती.

‘‘हिरवाणी हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत व्यग्र असल्यामुळे ते पूर्णवेळ उपलब्ध नसतील. मात्र अकादमीत सुरू असलेल्या सराव शिबिरात ते पूर्णवेळ संघासोबत असतील,’’ असे ‘बीसीसीआय’ च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय संघाला फलंदाजीच्या प्रशिक्षकाची आवश्यकता नाही. कारण मुख्य प्रशिक्षक आणि भारताचे माजी पुलंदाज डब्ल्यू. व्ही. रामन हेच ती जबाबदारी सांभाळतील. मात्र वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक नेमले जाण्याची शक्यता आहे.

गेले सहा ट्वेन्टी-२० सामने भारताने गमावले असून, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पुरुषांच्या संघाप्रमाणे महिला संघालाही सशक्त साहाय्यक मार्गदशकांची फळी उपलब्ध करण्यात येणार आहे.