News Flash

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बात्रा यांची निवड

राजीव मेहता सरचिटणीसपदी

| December 15, 2017 02:34 am

राजीव मेहता सरचिटणीसपदी

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ६० वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता. आयओएच्या निवडणुकीतून मी माघार घेत असून, अध्यक्षपदासाठी बात्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खन्ना यांनी आयओए निवडणूक आयोगाला लिहिले होते. मात्र हे पत्र खन्ना यांनी ३ डिसेंबरची माघार घेण्याची मुदत उलटल्यानंतर पाठवले होते. त्यामुळे औपचारिकता म्हणून झालेल्या निवडणुकीत बात्रा यांना १४२ मते पडली, तर खन्ना यांना १३ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत.

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष बिरेंद्र बैश्य हेसुद्धा सुरुवातीला अध्यक्षपदासाठी उत्सुक होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली. दिल्ली उच्च न्यायालयामुळे निवडणुकीपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते. क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून निवडणुकीला अंतरिम स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न क्रीडा प्रशासक अ‍ॅड. राहुल मेहरा यांनी केला. मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

कोषाध्यक्ष पदासाठी आनंदेश्वर पांडे यांची निवड झाली आहे, तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत आर. के. आनंद यांनी जनार्दनसिंग गेहलोत यांचा ९६-३५ असा पराभव केला.

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०३२च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या भारताच्या यजमानपदाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. या स्पर्धाच्या आयोजनासाठी सरकारचे आर्थिक बळ महत्त्वाचे असते. -नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:30 am

Web Title: narinder batra set to be elected ioa president
Next Stories
1 भारतीय हॉकीची शानदार वाटचाल
2 क्रिकेटचा ‘पंच’नामा
3 धोनीच्या ‘लाईक’ला चाहत्यांनी केलं अनलाईक
Just Now!
X