इतिहास आणि विक्रम हे रचण्यासाठीच असतात, पण त्यासाठी गुणवत्तेबरोबर दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक मेहनत, चिकाटी, जिद्द आणि विजिगीषु वृत्ती असायला हवी, या साऱ्या गोष्टींची योग्य सांगड, समन्वय झाला तर गगनभरारी घेण्याचे बळ तुमच्या पंखांमध्ये आपसूकच येते. स्पर्धा म्हटली की, जिंकण्याची ईर्षां आलीच, त्याने ती ईर्षां बाळगली, पण आक्रमकपणा त्याच्या डोक्यात कधीच नव्हता. कुस्तीची लढत बळाबरोबर तंत्राच्या जोरावरही जिंकता येऊ शकते, हे त्याने आत्मसात केले आणि  ऑलिम्पिकपटू मुंबईच्या नरसिंग यादवने सलग तिसऱ्यांदा मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. इतिहासात महाराष्ट्र केसरीची हॅट्ट्रिक करण्याचा पहिला मान नरसिंगने पटकावला आहे. नरसिंगने मुंबईच्याच सुनील साळुंखेवर ७-० असा दणदणीत विजय मिळवला आणि चाहत्यांच्या मनांसहित जेतेपदही जिंकले.
भोसरी येथील लांडगे क्रीडानगरीत झालेल्या या कुस्ती स्पर्धेला तब्बल एक लाख प्रेक्षक उपस्थित होते. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते सायंकाळी सव्वासात वाजता कुस्ती लावण्यात आली. नरसिंग हा गेले दोन वर्षे या किताबाचा मानकरी आहे, त्यामुळे त्याचे पारडे जड होते. पण सुनील हा त्याच्यापेक्षा वजनाने जास्त होता, त्यामुळे या लढतीबाबत साऱ्यांच्याच मनात उत्सुकता होती.
 लढतीच्या सुरुवातीलाच नरसिंग याने जवळजवळ एक लाख लोकांच्या उपस्थितीत आपल्या कुस्तीचे अप्रतिम कौशल्य दाखवले. त्याने पहिल्या सेकंदाला एकेरी पट काढून दोन गुणांची कमाई केली. पुन्हा एकेरी पट काढत एक गुण घेतला. त्यानंतर नरसिंगने एकहाती डाव टाकला व आणखी एका गुणाची कमाई केली. त्यामुळे सुनील हा बचावात्मक पवित्र्यात गेला. त्याचा फायदा घेत नरसिंगने भारंदाज डाव टाकला व तीन गुणांची कमाई केली.
पहिल्या दीड मिनिटांतच नरसिंगने ७-० अशी आघाडी घेतल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. महाराष्ट्र केसरी किताबाच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद मिळवणारा हा पहिलाच मल्ल आहे.
नरसिंगला यावेळी विजेतेपदाबरोबरच चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली. ही कुस्ती पाहण्यासाठी बेळगाव, नागपूर, चंद्रपूर आदी अनेक ठिकाणांहून चाहते आले होते.
ही लढत जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता. कारण गेली दोन वर्षे महाराष्ट्र केसरी अधिवेशन अनुभवले आहे. ही स्पर्धा संस्मरणीय झाली, प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळाला, विजयाने आनंदी आहे. –नरसिंग यादव
गादी विभागात सोलापूर तर माती विभागात कोल्हापूर विजेते
पुणे :सोलापूर जिल्हा संघाने ४४ गुण मिळवित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी विभागात सांघिक विजेतेपद जिंकले तर माती विभागात कोल्हापूर जिल्हा संघाने ४७ गुणांसह सांघिक अजिंक्यपद मिळविले.
भोसरी येथे झालेल्या या स्पर्धेतील गादी विभागात कोल्हापूर जिल्हा संघाने ४३ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. माती विभागात हा मान बीड संघास मिळाला.
गटवार निकाल
गादी विभाग-५५ किलो-१.उत्कर्ष काळे, २.आबा अटकळे, ३.राहुल शिंदे व प्रकाश कोळेकर. ६० किलो-१.विशाल माने, २.सोनबा गोंगाणे, ३.सागर लोखंडे व किशोर गायकवाड. ६६ किलो-१.महादेव कुसुमडे, २.संदेश काकडे, ३.अजित शेळके व संजय पाटील. ७४ किलो-१.रणजित नलावडे, २.संतोष गायकवाड, ३.प्रसाद सस्ते व चंद्रशेखर पाटील. ८४ किलो-१.नीलेश लोखंडे, २.बदाम मगदूम, ३.सतीश मुंडे व सुनील शेवतकर. ९६ किलो-१.सागर बिराजदार, २.विजय गुताड, ३.गुलाब आगरकर व संतोष लव्हटे.
माती विभाग-५५ किलो-१.शरद पवार, २.भरत पाटील, ३.विनोद वाक्षे. ६० किलो-१.दादासाहेब सरवदे, २.अरुण खेंगळे, ३.देवानंद पवार. ६६ किलो-१.बाबा मदाने, २.अंगद शेठ, ३.कुमार शेलार. ७४ किलो-१.रवींद्र करे, २.विश्वंभर खैरे, ३.जयदीप गायकवाड. ८४ किलो-१.विलास डोईफोडे, २.सरदार सावंत, ३.अनिल जाधव. ९६ किलो-१.साईनाथ रानवडे, २.सागर सुतार, ३.सारंग जमादार.

मामांचा वारसदार!
शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम लढतींपैकी गादी विभागात रुस्तुम-ए-हिंदू कै. हरिश्चंद्र तथा मामा बिराजदार यांचा मुलगा सागर याने ९६ किलो विभागात सुवर्णपदक जिंकले. त्याने आपल्या वडिलांचा कुस्तीचा वारसा पुढे चालविताना येथे अंतिम लढतीत विजय गुताडविरुद्ध अप्रतिम कुस्ती केली. त्याचे कौशल्य पाहून अनेकांना मामांची आठवण आली.  अन्य लढतीत आंतरराष्ट्रीय मल्ल रणजित नलावडे याने अपेक्षेप्रमाणे गादी विभागातील ७४ किलो गटात सुवर्णपदक जिंकले तर रवींद्र करे याने ७४ किलो माती विभागात सुवर्णमय कामगिरी केली. पुण्याच्या साईनाथ रानवडे याला माती विभागातील ९६ किलो गटात सुवर्णपदक मिळाले.

प्रेक्षकांकरिता मोठे स्क्रीन!
महाराष्ट्र केसरी किताबाची लढत पाहण्यासाठी दुपारी बारापासूनच प्रेक्षकांनी कुस्तीच्या मैदानावर येण्यास सुरुवात केली होती. केवळ महाराष्ट्र नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांमधूनही अनेक चाहते येथे आले होते. सर्व प्रेक्षकांना कुस्तीच्या लढतींचा आनंद मिळावा म्हणून प्रेक्षकांच्या गॅलरीत तीन ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. त्याखेरीज मैदानाबाहेरील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रेक्षकांकरिताही दोन स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी!
प्रेक्षकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. कुस्तीच्या आखाडय़ावर नामवंत मल्लांचे सत्कार सुरू असतानाही अशीच पुष्पवृष्टी करण्यात येत होती.